महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न नेहमी चर्चेत असतो. धोनीने यष्टीरक्षणात कायम बहारदार कामगिरी करत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीने निवृत्ती स्विकारल्यानंतर भारताने वृद्धीमान साहाला यष्टीरक्षणाची संधी दिली. यानंतर युवा खेळाडूला ऋषभ पंतलाही भारतीय संघात स्थान देण्यात आलं. साहाने आतापर्यंत आश्वासक कामगिरी केली आहे, मात्र पंतला आपल्याला मिळालेल्या संधीचा म्हणावा तसा लाभ घेता आलेला नाही. तरीही ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रॅड हॉगच्या मते भारताने कसोटीत साहाऐवजी पंतला आधी संधी द्यायला हवी होती. साहा हा पंतपेक्षा चांगला यष्टीरक्षक असला तरीही फलंदाजीसाठी पंतला संघात स्थान मिळायला हवं असं हॉगने म्हटलं आहे.

“ऋषभ पंत साहापेक्षा जास्त आक्रमक फलंदाजी करतो. भारतीय फलंदाजीविषयी बोलायचं झालं तर टॉप ऑर्डरमधले फलंदाज आपली कामगिरी करतात. सातव्या क्रमांकावर भारताला अशा फलंदाजाची गरज आहे, जो फटकेबाजी करुन धावा काढू शकेल. यामुळे एका अर्थाने संघाला फायदाच होणार आहे. यष्टीरक्षणात पंत काही संधी वाया घालवतो हे खरं आहे, साहाचं तंत्र त्याच्यापेक्षा चांगलं आहे. पण, फलंदाजीचा विचार केला असता माझ्यामते साहाऐवजी पंतला संघात स्थान मिळायला हवं”, हॉग आपल्या यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

२०१८ साली ऋषभ पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतने शतकी खेळी करत आपल्या प्रतिभा असल्याचं दाखवून दिलं होतं. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय यष्टीरक्षक आहे. आतापर्यंत १३ कसोटी सामन्यांमध्ये पंतने ३८.७६ च्या सरासरीने ८१४ धावा केल्या आहेत. ब्रॅड हॉगने यावेळी बोलत असताना साहाचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून वापर केला जावा असं म्हटलं. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये लोकेश राहुल हा भारतासाठी चांगला पर्याय असल्याचंही हॉग म्हणाला. २०१९ विश्वचषकानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये, त्याच्या अनुपस्थितीत पंत आणि राहुल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहेत.