भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद माझ्याकडे दिले तर एक वर्षांत संघाचा नावलौकिक उंचावण्याची कामगिरी करून दाखविन, असे भारताचा माजी कर्णधार धनराज पिल्लेने सांगितले.
तो म्हणाला, ‘‘भारतामध्ये अव्वल दर्जाच्या प्रशिक्षकांची कमतरता नाही, त्यामुळेच परदेशी प्रशिक्षकाची आपल्या संघाला आवश्यकता नाही. आपण विनाकारण परदेशी प्रशिक्षकांवर भरमसाठ खर्च करत आहोत. २००४मध्ये अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकच्या वेळी आपण गेऱ्हार्ड राच या परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली होती. त्यानंतर होजे ब्रासा व मायकेल नॉब्स या परदेशी प्रशिक्षकांना नियुक्त करण्याचा प्रयोग आपण केला. मात्र गेल्या बारा वर्षांत भारतासाठी आशादायक चित्र पाहावयास मिळाले नाही. अजून विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी आपण धडपडत आहोत.’’
सेड्रिक डिसुझा, वासुदेव भास्करन, राजिंदर सिंग यासारख्या भारतीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्या आहेत. मायकेल नॉब्स यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सध्या रिकामे आहे. संघासाठी परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याचे हॉकी इंडियाने जाहीर केले आहे.
धनराज म्हणाला, ‘‘भारतीय खेळाडूंना केवळ भारतीय प्रशिक्षकच चांगल्या रितीने सांभाळू शकतो. संघातील ५० ते ६० टक्के खेळाडू फारसे शिकलेले नाहीत. त्यांना परदेशी प्रशिक्षकांची इंग्लिश भाषा कळणे अवघड जाते. या खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकाबरोबर संवाद साधण्यासाठी दुभाषकाची मदत घ्यावी लागते. परदेशी प्रशिक्षक एकटे येत नाहीत. भारतीय खेळाडूंना खेळाचे ज्ञान देण्याची आवश्यकता नसून एक संघ म्हणून त्यांच्याकडून अव्वल दर्जाची कामगिरी करून घेणे महत्त्वाचे आहे.’’
हॉकी इंडियाने नियुक्त केलेले हाय परफॉर्मन्स संचालक रोलँट ओल्टमन्स यांच्या कामगिरीबाबत धनराज समाधानी नाही. ‘‘ओल्टमन्स हे अव्वल दर्जाचे प्रशिक्षक असतील तर हॉकी लीगमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या उत्तरप्रदेश विझार्ड्स संघास विजेतेपद का मिळाले नाही याचा विचार करण्याची आवश्यकता आहे,’’ असेही धनराजने सांगितले.