भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ७ बाद १९१ धावा केल्या. ट्रेव्हिस हेडच्या चिवट अर्धशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. पहिल्या डावात भारताने सर्वबाद २५० धावा केल्या. त्यानंतर उत्तम खेळ करून मोठी आघाडी घेण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मैदानावर आले. मात्र भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची धांदल उडाली. अश्विनने सर्वाधिक ३ बळी टिपले. सध्या ट्रेव्हिस हेड ६१ आणि मिचेल स्टार्क ८ धावांवर खेळत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. इशांत शर्माच्या पहिल्याच षटकात अॅरोन फिंच त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर हॅरिस आणि ख्वाजा यांनी खेळपट्टीवर तळ ठोकत संघाचा डाव सावरला. दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी झाली. अखेर रविचंद्रन आश्विनने हॅरिसला माघारी धाडत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने २ गड्यांच्या मोबदल्यात ५७ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर हॅरिस २६ धावांवर बाद झाला. अनुभवी शॉन मार्शला २ धावांत अश्विनने माघारी धाडले. लगेचच ख्वाजा २८ धावांवर तंबूत परतला. त्यामुळे चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ११७ अशी झाली होती. त्यानंतर तिसऱ्या सत्रात पीटर हॅंड्सकोम्ब ३४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ कर्णधार टीम पेनदेखील ५ धावा करून माघारी परतला. बुमराहने टाकलेला चेंडू स्टंपच्या रेषेत येणार नाही असा अंदाज करत कमिन्सने चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या पायावर आदळला आणि तो पायचीत झाला.

या आधी भारताने पहिल्या डावात २५० धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह जोडी भारताच्या धावसंख्येत काही धावांची भर घालेल, अशी आशा होती. मात्र जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने यष्टीरक्षक टीम पेनकडे झेल दिला आणि भारताचा डाव संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने ३ तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि नॅथन लॉयन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

Live Blog

12:57 (IST)07 Dec 2018
भारताचे दमदार पुनरागमन; दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ७ बाद १९१

भारताचे दमदार पुनरागमन; दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ७ बाद १९१

12:21 (IST)07 Dec 2018
पॅट कमिन्स पायचीत; ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का

बुमराहने टाकलेला चेंडू स्टंपच्या रेषेत येणार नाही असा अंदाज करत कमिन्सने चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या पायावर आदळला आणि तो पायचीत झाला.

11:55 (IST)07 Dec 2018
ट्रेव्हिस हेडचे १०३ चेंडूत अर्धशतक

भारताच्या अचूक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियायचे फलंदाज गुडघे टेकत असताना ट्रेव्हिस हेड चिवट खेळी करत आहे. त्याने १०३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले असून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न तो करत आहे.

--

11:14 (IST)07 Dec 2018
कर्णधार पेन बाद; ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी तंबूत

ऑस्ट्रलियाचा कर्णधार टीम पेनदेखील यष्टिरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. इशांत शर्माने ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी तंबूत धाडला. पेनने ५ धावा केला.

10:48 (IST)07 Dec 2018
पीटर हॅड्सकोम्ब झेलबाद; ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का

९ महिन्यांच्या निलंबनाची कारवाई भोगून पुनरागमन केलेला पीटर हॅड्सकोम्ब झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का बसला. बुमराहने ३४ धावांवर त्याला बाद केले.

10:15 (IST)07 Dec 2018
भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा; चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया ४ बाद ११७

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांप्रमाणेच भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा केला. त्यामुळे चहापानापर्यंत आता ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ११७ अशी झाली आहे. यातील ३ बळी अश्विनने तर १ इशांत शर्माने टिपला.

09:53 (IST)07 Dec 2018
४ गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाची शतकी मजल

भारताच्या गोलंदाजांच्या आचूक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या संघाला शतकी मजल मारण्यासाठी ४ गडी गमवावे लागले. 

09:08 (IST)07 Dec 2018
उस्मान ख्वाजा झेलबाद, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर ख्वाजा झेलबाद, ऋषभ पंतने घेतला झेल. ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा खेळाडू तंबूत परतला

08:20 (IST)07 Dec 2018
ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, शॉन मार्श त्रिफळाचीत

उपहारानंतर भारताला पहिलं यश, आश्विनच्या गोलंदाजीवर शॉन मार्श त्रिफळाचीत

07:40 (IST)07 Dec 2018
पहिल्या सत्रात भारताची चांगली झुंज, ऑस्ट्रेलियाचे २ गडी माघारी

दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत ऑस्ट्रेलिया ५७/२. आश्विन, इशांत शर्माला प्रत्येकी १-१ बळी

07:18 (IST)07 Dec 2018
पहिल्या सत्रात भारताला दुसरं यश, हॅरिस माघारी

रविचंद्नन आश्विनच्या गोलंदाजीवर हॅरिस माघारी, ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का

07:17 (IST)07 Dec 2018
हॅरिस-ख्वाजाच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला

मार्कस हॅरिस आणि उस्मान ख्वाजा जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला

05:45 (IST)07 Dec 2018
ऑस्ट्रेलियाची अडखळती सुरुवात, अॅरोन फिंच त्रिफळाचीत

इशांत शर्माच्या पहिल्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर फिंच त्रिफळाचीत, ऑस्ट्रेलियाचा पहिला गडी माघारी

05:45 (IST)07 Dec 2018
भारताचा डाव २५० धावांवर आटोपला

जोश हेजलवूडने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्याच चेंडूवर शमीला बाद करत भारताचा डाव २५० धावांवर संपुष्टात आणला