तिसऱ्या कसोटीत अखेर सामन्यात भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना अखेर यश आलेलं आहे. दिवसाअखेरीस भारताचे ६ गडी माघारी धाडण्यात लंकेच्या गोलंदाजांना यश आलं आहे. भारतीय डावाची चांगली सुरुवात झाल्यानंतर मलिंदा पुष्पकुमाराने लोकेश राहुलला माघारी धाडलं. त्यानंतर ठराविक अंतराने शतकवीर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराला लागोपाठ माघारी धाडण्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना यश आलं . शिखर धवन ११९ धावा काढून दिनेश चंडीमलच्या हाती झेल देत माघारी परतला.  पाठोपाठ चेतेश्वर पुजाराही अवघ्या ८ धावांवर झेलबाद झाला.

यानंतर कर्णधार विराट कोहलीने अजिंक्य रहाणेच्या सोबतीने ३५ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पुष्पकुमाराच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने पाचव्या विकेटसाठी रविचंद्रन अश्विनसोबत पुन्हा एकदा ३२ धावांची भागीदारी केली. मात्र संदकनच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये करुणरत्नेच्या हाती झेल देत तो माघारी परतला. यानंतर रविचंद्रन अश्विनने वृद्धीमाना साहाच्या मदतीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. साहा आणि आश्विनने सहाव्या विकेटसाठी २६ धावांची छोटी भागीदारीही रचली. मात्र दिवसाचा खेळ संपायाल अवघी ३ षटकं शिल्लक असताना अश्विनला माघारी धाडत विश्वा फर्नांडोने भारताला आणखी एक धक्का दिला. त्यामुळे अखेरच्या सत्रात भारताचा निम्मा संघ माघारी धाडत लंकेने भारताला चांगलं प्रत्युत्तर दिलं आहे. पहिल्या दिवसाअखेरीस भारताची अवस्था ही ३२९/६ अशी झालेली आहे.

त्याआधी श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीत भारताच्या फलंदाजांनी पहिल्या दोन सत्रांमध्ये सामन्यावर आपलं वर्चस्व गाजवलं. गॉल कसोटीप्रमाणे शिखर धवनने या सामन्यातही आपलं शतक झळकावलं आहे. लोकेश राहुलच्या सोबतीने शिखरने पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची भागीदारी केली. लोकेश राहुलही शतक झळकावणार असं वाटत असतानाच, मलिंदा पुष्पकुमाराच्या गोलंदाजीवर दिमुथ करुणरत्नेच्या हाती झेल देत तो माघारी परतला. तब्बल ६ गोलंदाज खर्ची केल्यानंतर श्रीलंकेला भारताची पहिली विकेट काढण्यात यश आलं आहे. धवनने श्रीलंकेच्या गोलंदाजांची पिस काढत मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी केली. त्याच्या शतकी खेळीत तब्बल १६ चौकारांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूने चेतेश्वर पुजारानेही धवनला चांगली साथ दिली. त्याने ८५ धावांची खेळी केली.

नाणेफेक जिंकत फलंदाजी घेतलेल्या भारतीय संघाला  दोन्ही सलामीवीरांनी भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. पहिल्या सत्रात आक्रमक सुरुवात करत एकही विकेट न गमावता भारताने १३४ धावा फलकावर लावल्या. त्यामुळे ही जोडी टिकल्यास श्रीलंकन गोलंदाजांसमोरच्या अडचणी वाढणार असं वाटत असतानाच पुष्पकुमाराने लोकेश राहुलला माघारी धाडलं.

श्रीलंकेकडून मलिंदा पुष्पकुमाराने सर्वाधिक ३ बळी घेतले, त्याला लक्षन संदकनने २ बळी घेत चांगली साथ दिली. अखेरच्या काही षटकांमध्ये विश्वा फर्नांडोने एक बळी घेत आपली कामगिरी बजावली. सलग दोन कसोटींमध्ये श्रीलंकेला पराभवचा सामना करावा लागल्याने या कसोटीत विजय मिळवून मालिकेचा शेवट गोड करण्याकडे श्रीलंकेच्या संघाचा कल असेल. त्यामुळे या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा संघ भारताला कशी लढत देतो हे पहावं लागणार आहे.

  • पहिल्या दिवसाअखेरीस श्रीलंकेचं भारताला चोख प्रत्युत्तर, भारताची धावसंख्या ३२९/६
  • अश्विन आणि साहामध्ये २६ धावांची छोटीशी भागीदारी, मात्र फर्नांडोच्या गोलंदाजीवर अश्विन माघारी
  • मात्र संदकनच्या गोलंदाजीवर स्पिपमध्ये झेल देत कोहली माघारी परतला, भारताला पाचवा धक्का
  • विराट कोहलीची रविचंद्रन अश्विनसोबत ३२ धावांची भागीदारी
  • मात्र पुष्पकुमाराने रहाणेला बाद करत, भारताला चौथा धक्का दिला
  • कोहली आणि रहाणेमध्ये चौथ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी
  • चहापानापर्यंत भारताची अवस्था २३५/३
  • ठराविक अंतराने चेतेश्वर पुजाराही माघारी, भारताला तिसरा धक्का
  • दुसऱ्या सत्रात लंकेच्या गोलंदाजांचं कमबॅक, शिखर धवन माघारी
  • लोकेश राहुलला बाद करत पुष्पकुमाराने भारताला पहिला धक्का दिला, राहुलच्या ८५ धावा
  • शिखर धवनची चौफेर फटकेबाजी, गॉल कसोटीपाठोपाठ पल्लकेलेच्या मैदानातही दमदार शतक
  • लंच टाईमनंतर भारतीय सलामीवीरांकडून पुन्हा आक्रमक खेळ
  • पहिल्या दिवसाच्या लंच टाईमपर्यंत भारताची धावसंख्या १३४/०
  • भारताची जोडी फोडण्यासाठी लंकेचे शर्थीचे प्रयत्न, मात्र सर्व गोलंदाज हतबल
  • लोकेश राहुलचीही धवनला उत्तम साथ, कसोटी सामन्यांमधलं सलग ७ वं अर्धशतक साजरं
  • शिखर धवनचा फॉर्म कायम, तिसऱ्या कसोटीत अर्धशतक, भारताची धावसंख्या शंभरीपार
  • दोन्ही सलामीवीरांकडून भारताच्या डावाची सावध सुरुवात, संघाचं अर्धशतक फलकावर
  • रविंद्र जाडेजाऐवजी ‘चायनामन’ कुलदीप यादवला संघात स्थान
  • नाणेफेक जिंकत भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय