शमी-इशांतचा भेदक मारा; विल्यम्सनची एकाकी झुंज

वृत्तसंस्था, साऊदम्पटन

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीमधील मंगळवारचा पाचवा दिवस रंगतदार ठरला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात ३२ धावांची माफक आघाडी मिळवता आली. मग भारताने दुसऱ्या डावात २ बाद ६४ धावा केल्या. त्यामुळे बुधवारच्या राखीव दिवसाची ९८ षटके निर्णायक ठरणार की सामना अनिर्णीत राहणार, ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

न्यूझीलंडने मंगळवारी २ बाद १०१ धावसंख्येवरून पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. परंतु शमी आणि इशांत यांनी टिच्चून मारा करीत किवी फलंदाजांना एकापाठोपाठ एक हादरे दिले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने एकाकी लढत देत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला; परंतु इशांतमुळे त्याचे अर्धशतक हुकले. दुसऱ्या स्लीपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

मंगळवारी सकाळच्या सत्रात शमीने अनुभवी रॉस टेलरचा (३७ चेंडूंत ११ धावा) अडसर दूर केला. शुभमन गिलने शॉर्ट कव्हरला त्याचा सूर मारून झेल टिपला. मग इशांतने भरवशाच्या हेन्री निकोलसला (७) बाद केले. दुसऱ्या स्लीपमध्ये रोहित शर्माने त्याचा झेल घेतला. त्यानंतर शमीने बीजे वॉटलिंगचा (१) त्रिफळा उडवला.

सामन्याच्या दुसऱ्या सत्रात विल्यम्सनला कॉलिन डीग्रँडहोम (१३) आणि कायले जॅमीसन (२१) यांनी साथ देत धावसंख्येला स्थर्य देण्याचा प्रयत्न केला. पण शमीने ग्रँडहोमला पायचीत केले, तर जॅमीसनला जसप्रीत बुमराद्वारे झेलबाद केले. त्यानंतर खेळपट्टीवर ठाण मांडणारा विल्यम्सन माघारी परतला. उशिराने चेंडू हाती आलेल्या रविचंद्रन अश्विनने नील व्ॉगनरला भोपळाही फोडू दिला नाही. उत्तरार्धात टिम साऊदीने ३० धावांची झुंजार खेळी केली. पण रवींद्र जडेजाने त्याचा त्रिफळा उडवून न्यूझीलंडच्या डावापुढे पूर्णविराम दिला.

भारताच्या दुसऱ्या डावात साऊदीने शुभमन गिलला (८) पायचीत करून सलामीची जोडी फोडली. मग साऊदीने रोहित शर्माला (३०) पायचीत करीत आणखी एक धक्का दिला. खेळ थांबला, तेव्हा चेतेश्वर पुजारा १२ आणि विराट ८ धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : २१७

’ न्यूझीलंड (पहिला डाव) : ९९.२ षटकांत सर्व बाद २३५(डेव्हॉन कॉन्वे ५४, केन विल्यम्सन ४९; मोहम्मद शमी ४/७०, इशांत शर्मा ३/४८)

’ भारत (दुसरा डाव) : ३० षटकांत २ बाद ६४ (रोहित शर्मा ३०; टिम साऊदी २/१७)