पहिल्या कसोटी सामन्यात ५३ धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या डावात कोसळली आहे. हेजलवूड आणि कमिन्सच्या धारधार गोलंदाजीपुढे भारतीय संघातील दिग्गज एकापाठोपाठ माघारी परतले. दुसऱ्या दिवसाअखेरीस १ बाद ९ वर डाव संपवलेल्या भारताकडे ६२ धावांची आघाडी होती. मात्र तिसऱ्या दिवसाच्या खेळात कांगारुंच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजीचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. दुसऱ्या डावांत भारतीय संघाला ९ गड्यांच्या मोबदल्यात ३६ धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताच्या या खराब फलंदाजीमुळे ४६ वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रमही आज तुटला आहे. १९७४ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं ४२ धावांची निच्चांकी धावसंख्या उभारली होती. आता ४६ वर्षांनंतर भारतानं हा लाजीरवाणा विक्रम मोडला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात काय झालं?
पॅट कमिन्स आणि हेजलवूड यांच्या माऱ्यापुढे भारतीय संघाची फलंदाजी ढासळली. भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मयांक अग्रवाल, साहा आणि अश्विनसारखे फलंदाजांना एकामागोमाग एक माघारी धाडत ऑस्ट्रेलियाने भारताला बॅकफूटला ढकललं. दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त ३६ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघाची ही निच्चांकी धावसंख्या ठरली आहे.

१९७४ मधील लॉर्ड्स कसोटीत काय झालं होतं?
१९७४ मध्ये तिसऱ्या डावांत भारतीय संघ १७ षटकांत ४२ धावांवर बाद झाला होता. एकनाथ सोलकर (१८ नाबाद) वगळता एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नव्हती. सुनील गावसकर, फारुख इंजिनिअर, अजित वाडेकर, गुंडाप्पा विश्वनाथ आणि ब्रीजेश पटेल या धुरंधर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नव्हती. इंग्लंडकडून ख्रिस ओल्डनं पाच विकेट घेतल्या होत्याल तर ज्योफ अर्नोल्ड यानं ४ विकेट घेतल्या होत्या.