सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी फिटनेसबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याच्या दृष्टिने या मुद्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. सध्याच्या क्रिकेटमध्ये विविध बदल वेगाने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे ट्रेनर शंकर बसु यांच्यासमोर प्रत्येक खेळाडूला अग्नी परीक्षा द्यावी लागते. यात पात्र ठरणाऱ्या खेळाडूलाच संघात स्थान मिळू शकते.

खेळाडूंना फिटनेस सिद्ध करण्यासाठी यो-यो टेस्ट यशस्वीरित्या पार पाडावी लागते. याच टेस्टमध्ये अपात्र ठरल्यामुळे युवराज सिंग आणि सुरेश रैनाला पुनरागमन करणे अवघड झाले आहे. या कठीण चाचणीमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू २२ गुण सहज मिळवतात. भारतीय संघातील विराट कोहली, रवींद्र जाडेजा आणि मनिष पांडे प्रत्येकवेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूप्रमाणे गुण मिळवण्यात यशस्वी ठरतात. तर अन्य खेळाडू १९.५ पेक्षा अधिक गुण मिळवतात. यापेक्षा कमी गुण असणाऱ्या खेळाडू फिटनेसमध्ये अपात्र ठरतो. नव्वदच्या दशकात भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, रॉबिन सिंह आणि अजय जडेजा जास्तीत जास्त १६ ते १६.५ पर्यंत गुण मिळवत होते.

काय आहे यो-यो टेस्ट?
अनेक ‘शंकू’च्या मदतीने २० मीटर अंतरावर दोन रांगा तयार केल्या जातात. खेळाडूला या दोन रांगेच्यामधून सलग धावावे लागते. धावत असताना बीपच्या आवाजावर मागे वळावे लागते. दर मिनिटाला ही गती वाढत जाते. गती कमी झाल्यास बीपने दोन वेळा सावध केले जाते. त्यानंतरही खेळाडूची गती कमी राहिल्यास चाचणी थांबवली जाते. ही संपूर्ण चाचणी प्रक्रिया संगणकीकृत आहे.