भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी रॉस टेलर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळत आहे. तिरुअनंतपुरम येथे होणाऱ्या सामन्यापूर्वी रॉस टेलरने इन्स्टाग्रामवरुन वीरेंद्र सेहवागसाठी एक मजेशीर संदेश लिहिलाय. सेहवाग राजकोटच्या मैदानावरील सामन्यानंतर येथील दर्जीचे (शिंपी) दुकान बंद झाले. आता तिरुअनंतपूरममध्ये पुढील शिलाई करु, असे सांगत पुढील सामन्यात दमदार कामगिरी करण्यास सज्ज असल्याचे त्याने म्हटलंय. त्याने एका दुकानाचा फोटो देखील शेअर केलाय. सामना पाहायला नक्की ये! असा उल्लेखही त्याने आपल्या पोस्टमध्ये केलाय.

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावरील त्याच्या खुमासदार शैलीतील ट्विटससाठी प्रसिद्ध आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर सेहवाग आणि रॉस टेलर यांच्यात जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले होते. न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या रॉस टेलरचे अभिनंदन करताना सेहवागने त्याचा उल्लेख दर्जी (शिंपी) असा केला होता. “वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील (कपडे शिवण्याच्या) ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली”, असे मजेशीर ट्विट करत सेहवागने टेलरचे कौतुक केले. त्यावर रॉस टेलरनेही सेहवागला चक्क हिंदीत रिप्लाय दिला होता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना केरळमधील तिरुअनंतपुरम येथे रंगणार आहे. सध्याच्या घडीला दोन्ही संघानी प्रत्येकी एक सामना जिंकत मालिकेत बरोबरीवर आहेत. अंतिम आणि निर्णायक सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील. यापूर्वी झालेल्या एकदिवसी मालिकेत भारताने न्यूझीलंडला २-१ असे पराभूत केले होते.  ट्वेन्टी-२० मालिका जिंकून या  पराभवाची परतफेड करण्याची संधी न्यूझीलंडकडे आहे.