नोव्हाक जोकोव्हिच या श्रेष्ठ खेळाडू्च्या अनुपस्थितीतही सर्बियाने भारताविरुद्धचे एकेरीचे दोन्ही सामने जिंकून डेव्हिस चषक टेनिस लढतीत २-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. भारताच्या युकी भांब्री व सोमदेव देववर्मन या दोघांनाही एकेरीत पराभवास सामोरे जावे लागले.
भारताच्या युकी भांब्री याला डेव्हिस चषक टेनिस लढतीमधील संधीचा लाभ घेता आला नाही. सर्बियाच्या दुसान लाजोविक याने युकीवर ६-३, ६-२, ७-५ अशी सरळ तीन सेट्समध्ये मात करीत संघास भारताविरुद्ध १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ फिलीप क्राजिनोविक याने सोमदेव याचे आव्हान ६-१, ४-६, ६-३, ६-२ असे परतविले.  युकी याला लाजोविकविरुद्ध स्वत:च्या खेळावर अपेक्षेइतके नियंत्रण ठेवता आले नाही. त्याने केलेल्या अक्षम्य चुकांचा फायदा घेत लाजोविकने त्याला एकही सेट घेण्यापासून वंचित ठेवले. युकी याला सात ब्रेकपॉइन्ट्सचा फायदा घेता आला नाही. त्याउलट लाजोविक याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांबरोबरच प्रभावी सव्र्हिसही केल्या. युकी याला स्वत:च्या सव्र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याने जमिनीलगत फटक्यांचा कल्पकतेने उपयोग केला मात्र तरीही लाजोविक याने त्यावर सुरेख फटके मारले.
 सोमदेव याच्याकडून मोठय़ा अपेक्षा होत्या मात्र पहिल्या सेटमध्ये फिलीप याने दोन वेळा सव्र्हिस ब्रेक मिळविला. त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच त्याने अचूक सव्र्हिसचाही कल्पकतेने उपयोग केला. हा सेट गमावूनही सोमदेव याचे मनोधैर्य भक्कम होते. त्याने दुसऱ्या सेटमध्ये जमिनीलगत सुरेख फटके मारले तसेच व्हॉलीजही उपयोग केला. हा सेट त्याने ६-४ असा घेत सामन्यातील रंगत वाढविली.
तिसऱ्या सेटमध्ये सोमदेव याने सुरुवातीस चांगला खेळ केला मात्र त्याची सव्र्हिस तोडली गेली व तेथूनच त्याने खेळावरील नियंत्रण गमावले. फिलीप याने क्रॉसकोर्ट फटक्यांचाही बहारदार खेळ केला. त्याने सोमदेवच्या सव्र्हिसला खणखणीत उत्तर दिले. हा सेट घेतल्यानंतर त्याचा आत्मविश्वास उंचावला. त्याने चौथ्या सेटमध्येही सोमदेवला निष्प्रभ केले. त्याने दोन वेळा सव्र्हिसब्रेक मिळविला. हा सेट घेत त्याने सव्वादोन तास चाललेली लढत जिंकली.