एएफसी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा * दक्षिण कोरियाकडून १-० ने पराभूत

क्वालालंपूर : फिफा विश्वचषक १७ वर्षांखालील स्पर्धेत स्वत:च्या गुणवत्तेच्या आधारावर पहिल्यांदाच मजल मारण्याचे भारताच्या संघाचे स्वप्न अखेर भंगले. एएफसी १६ वर्षांखालील फुटबॉल अिजक्यपद स्पर्धेत भारताला बलाढय़ दक्षिण कोरियाकडून ०-१ असा निसटता पराव पत्करावा लागला. गेल्या १६ वर्षांत पहिल्यांदाच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळणाऱ्या भारताने कोरियाला कडवी लढत दिली. विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या कोरियाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले तरीही त्यांना फक्त एकमेव गोलाच्या आधारावर उपांत्य फेरीत आगेकूच करता आली. या विजयासह २०१९ साली पेरू येथे होणाऱ्या फिफा विश्वचषक १७ वर्षांखालील स्पर्धेत मजल मारणारा दक्षिण कोरिया हा आशियातील चौथा आणि अंतिम संघ ठरला.

पेटालिंग जया स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्याआधी कोरियाने या स्पर्धेत तब्बल १२ गोल झळकावले होते तर प्रतिस्पर्धी संघाकडून एकही गोल स्वीकारला नव्हता. त्यामुळे या सामन्यात कोरियाचेच पारडे जड होते. दुसऱ्या सत्रात मैदानात उतरणाऱ्या जेआँग सँग-बिन याने सुरेख गोल झळकावत कोरियाला ६८व्या मिनिटाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला. बलाढय़ संघाकडून पराभव पत्करला तरी या स्पर्धेतील भारताची कामगिरी खूपच चांगली झाली आहे. भारताने या स्पर्धेत फक्त एकच गोल स्वीकारला.

भारताचा गोलरक्षक नीरज कुमार याने पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत कोरियाचे हल्ले परतवून लावले. १४व्या मिनिटाला त्याने कोरियाचा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर ३४व्या आणि ३६व्या मिनिटाला त्याने दोन गोल वाचवले. त्यानंतर लगेचच भारताच्या रवी राणाने केलेला गोल करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. ६४व्या मिनिटालाही नीरजने सुरेख बचाव करत कोरियाला आघाडी घेण्यापासून रोखले.

अखेर ६८व्या मिनिटाला जेआँग सँगबिनने गोल करत कोरियाला आघाडीवर आणले. भारताने बरोबरीसाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळाले नाही.