तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी प्रयोगांची शक्यता; फझल, यादव, धवन, उनाडकटला संधी मिळण्याची शक्यता

झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेवर भारताने आधीच वर्चस्व प्राप्त केले आहे. आता तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यासह झिम्बाब्वेच्या भूमीवर सलग तिसऱ्यांदा निभ्रेळ यश प्राप्त करण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत भारताच्या दुसऱ्या फळीने आरामात विजय मिळवल्यामुळे शेवटच्या लढतीसाठी संघात काही बदल करण्याचे संकेत कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिले आहेत. दोन्ही सामने एकतर्फी झाल्यानंतर किमान तिसऱ्या सामन्यात तरी रोमहर्षक लढत पाहायला मिळेल अशी क्रिकेटरसिकांची अपेक्षा आहे. एकदिवसीय मालिकेनंतर तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका हरारे स्पोर्ट्स क्लबवरच होणार आहे. २०१३ आणि २०१५ नंतर भारतीय संघ तिसऱ्यांदा शानदार विजय मिळवणार आहे.

भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना फलंदाजीची पुरेशी संधी मिळाल्यामुळे फलंदाजीच्या फळीत बदल होण्याची शक्यता आहे, असे धोनीने सांगितले. सलामीवीर लोकेश राहुलने पदार्पणीय एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. त्याच्यासह अंबाती रायुडूला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फैझ फझल करुण नायरच्या साथीने सलामीला उतरू शकेल. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या नायरने दुसऱ्या सामन्यात ३९ धावा केल्या. याचप्रमाणे रायुडूच्या जागी नवोदित मनदीप सिंगला संधी मिळू शकेल.

वेगवान गोलंदाजांच्या फळीत बरिंदर शरण, धवल कुलकर्णी किंवा जसप्रित बुमराह यांच्यापैकी एकाला धोनी विश्रांती देऊ शकेल. या परिस्थितीत जयदेव उनाडकट किंवा अष्टपैलू रिशी धवनला संघात स्थान मिळू शकेल. लेग-स्पिनर यजुवेंद्र चहलने दुसऱ्या सामन्यात आपल्या कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे चहल किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला वगळल्यास ऑफ-स्पिनर जयंत यादवला पदार्पण करता येऊ शकते.

मागील दोन्ही लढतींमध्ये नाणेफेक जिंकल्यावर धोनीने झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. या पाश्र्वभूमीवर बुधवारच्या सामन्यात तिसऱ्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर धोनी कोणता निर्णय घेतो, ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

झिम्बाब्वेचा संघ भारताच्या गोलंदाजीच्या आक्रमणापुढे पूर्णत: नतमस्तक होत असल्याचे चित्र दोन्ही सामन्यांत दिसून आले. दुसऱ्या सामन्यात वुसी सिबांडाने ६९ चेंडूंत ५३ धावांची झुंजार खेळी साकारली आणि सिकंदर रझासोबत ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र या भागीदारीनंतर झिम्बाब्वेच्या सहा फलंदाजांनी २० धावांत हाराकिरी पत्करली. त्यामुळे त्यांचा डाव फक्त १२६ धावांत आटोपला.

संघ

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), लोकेश राहुल, फैझ फझल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, केदार जाधव, मनदीप सिंग, रिशी धवन, जसप्रित बुमराह, जयंत यादव, यजुवेंद्र चहल, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी, अक्षर पटेल.

झिम्बाब्वे : ग्रॅमी क्रिमर (कर्णधार), तेंडाई चटारा, चामू चिभाभा, एल्टन चिगुंबुरा, तेंडाई चिसोरो, क्रेग एव्‍‌र्हिन, नेव्हिले मॅडझिवहा, टिमीकेन मारूमा, हॅमिल्टन मसाकाझा, वेलिंग्टन मसाकाझा, पीटर मूर, ट्वानाडा मुपारिवा, रिचर्ड मुतुम्बामी (यष्टिरक्षक), तौराई मुझाराबानी, वुसीमुझी सिबांडा, सिकंदर रझा, डोनाल्ट तिरिपानो, सीन विल्यम्स.

सामन्याची वेळ : दुपारी १२.३० वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : टेन ३, डीडी नॅशनल