प्रशिक्षक दीपाली देशपांडे आणि सुमा शिरुर यांना विश्वास

सुप्रिया दाबके, लोकसत्ता

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये नेमबाजी या क्रीडा प्रकारात पिस्तूल आणि रायफलमध्ये भारताला पदकांची निश्चित हमी आहे, असा विश्वास वरिष्ठ राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे आणि कनिष्ठ संघाच्या प्रशिक्षक सुमा शिरुर यांनी व्यक्त केला.

यंदा टोक्यो ऑलिम्पिकमध्ये संजीव राजपूत, ऐश्वरी तोमर, दिव्यांश सिंग परमार, दीपक कुमार, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, अंगड बाजवा, मैराज अहमद खान, तेजस्विनी सावंत, अंजुम मुदगील, अपूर्वी चंडेला, राही सरनोबत, चिंकी यादव, मनू भाकर, यशस्विनी देस्वाल अशा विक्रमी १५ नेमबाजांनी ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे. वर्षभरातील कामगिरीमधील सातत्य हे यशासाठी महत्त्वाचे असेल, याकडे या दोघींनी लक्ष वेधले.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पुरुष आणि महिला विभागात पदकांची संख्या समान आहे. भारताकडून १५ निश्चित झालेल्या स्थानांपैकी आठ स्थाने ही महिलांची आहेत, असे दीपाली देशपांडे यांनी सांगितले. ‘‘याआधीच्या ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या स्पर्धा जास्त होत्या. मात्र स्त्री-पुरुष समानता दाखवत ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिलांच्या पदकांची आणि स्पर्धाची संख्या सारखी करण्यात आली आहे. हे प्रशंसनीय आहे. त्याशिवाय मिश्र सांघिक प्रकारदेखील समाविष्ट करण्यात आला आहे,’’ असे सुमा शिरुर यांनी म्हटले आहे.

‘‘ऑलिम्पिकसाठी पात्र ठरताना भारताच्या नेमबाजांनी विश्वचषक, आशियाई क्रीडा स्पर्धा अशा प्रत्येक स्पर्धेत सुवर्णपदके मिळवली आहेत. अर्थातच या सर्व स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरील असतात. यशाचे हे सातत्य पाहता ऑलिम्पिकमध्येही यंदा नेमबाज पदके मिळवतील याची खात्री आहे. महिला आणि पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल, महिलांच्या २५ मीटर पिस्तूल या प्रकारांमध्ये भारताचे नेमबाज निश्चित पदके मिळवतील अशी खात्री आहे,’’ असे सुमा शिरुर म्हणाल्या.

‘‘टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पिस्तूल आणि रायफल प्रकारात यंदा निश्चितपणे पदकांची अपेक्षा आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून भारतीय नेमबाजांनी विश्वचषकासारख्या स्पर्धामध्ये कामगिरीत सातत्य दाखवत सुवर्णपदकांची कमाई केली आहे. नेमबाजी हा एक वैयक्तिक स्तरावरील खेळ असला तरी भारतीय संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये नेमबाजांना खेळवायचे, त्यासाठी कशी तयारी करायची, यावर आम्ही गेले वर्षभर सातत्याने मेहनत घेत आहोत,’’ असे दीपाली देशपांडे यांनी म्हटले आहे.