‘खूब लडी मर्दानी, वह तो हॉकीवाली रानी थी..’ हे बोल भारताची हॉकीपटू राणी रामपालने सार्थ ठरवले. त्यामुळेच रविवारी भारतीय मुलींनी इतिहास घडविला. कनिष्ठ महिला विश्वचषक स्पध्रेत राणीच्या पराक्रमामुळे पेनल्टी स्ट्रोक्समध्ये इंग्लिश संघावर ३-२ अशी मात करत भारताने प्रथमच कांस्यपदकावर मोहोर उमटवली. हॉकीमध्ये भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर निराशाजनक कामगिरी होत असताना  कनिष्ठ महिला संघाने मिळवलेल्या यशामुळे दिलासा मिळाला आहे.
भारत-इंग्लंड हा सामना पूर्ण वेळेत १-१ असा बरोबरीत सुटला. भारतीय महिलांनी या स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारताना आश्चर्यजनक कामगिरी केली होती. उपांत्य फेरीत नेदरलँड्सकडून ०-३ असा पराभव पत्करल्यानंतर भारताच्या कांस्यपदकाच्या आशा धूसर झाल्या होत्या. परंतु भारतीय महिला खेळाडूंनी शेवटपर्यंत जिगरबाज खेळ करीत कांस्यपदक खेचून आणले.
सामन्याच्या १३व्या मिनिटाला १८ वर्षीय राणी रामपालने भारताचे खाते उघडले. परंतु सामन्याच्या ५५व्या मिनिटाला इंग्लंडच्या अ‍ॅना तोमानने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर झालेल्या पेनल्टी स्ट्रोक्सच्या वेळी पुन्हा राणीनेच भारताचा गोल केला. मात्र नवज्योत कौर, वंदना कटारिया, नवनीत कौर व पूनम राणी यांनी गोल करण्याच्या संधी दवडल्या. इंग्लंडकडून अ‍ॅना तोमान, ज्यो लिहे, शोना मॅकलीन व ल्युसी हिमॅस यांनी पेनल्टी स्ट्रोक्स वाया घालवले. तथापि, शेवटच्या स्ट्रोक्सच्या वेळी एमिली डेफ्रोनो हिने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे पुन्हा पेनल्टी स्ट्रोक्स घेण्यात आले. त्यावेळी भारताकडून राणी व १७ वर्षीय खेळाडू नवनीत कौर यांनी गोल केले तर पूनम राणी हिला गोल करता आला नाही. इंग्लंडकडून डेफ्रोनो हिने गोल केले, मात्र तिच्या अन्य सहकारी शोना मॅकलीन व अ‍ॅना तोमान यांना गोल करता आला नाही.
हा सामना शेवटपर्यंत चुरशीने खेळला गेला. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता मात्र त्याचा फायदा त्यांच्या ग्रेस बाल्सडोनला घेता आला नाही. १३व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा घेत राणीने भारताला आघाडी मिळवून दिला. पूर्वार्धात हीच आघाडी भारताने कायम ठेवली होती. उत्तरार्धात इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार आक्रमण केले. अखेर ५५व्या मिनिटाला त्यांच्या अ‍ॅना तोमान हिने गोल केला. या बरोबरीनंतर दोन्ही संघांनी सातत्याने चाली केल्या. दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नरसह गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. तथापि, गोल करण्यात त्यांना यश मिळाले नाही. भारताने सामन्यात चानू निंगोम्बम हिच्याकडे गोलरक्षणाची जबाबदारी दिली होती. या स्पर्धेत त्याआधी एकही मिनिट न खेळणाऱ्या बिगान सोये या राखीव गोलरक्षकाला पेनल्टी स्ट्रोक्सच्या वेळी खेळवण्यात आले. हा निर्णय भारतासाठी निर्णायक ठरला. तिने सुरेख गोलरक्षण केले.
हॉकीपटू झाल्या लक्षाधीश!
भारतीय महिलांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीचे कौतुक करीत हॉकी इंडियाने संघातील प्रत्येक खेळाडू व प्रशिक्षक यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. त्याचबरोबर संघाच्या सहकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरेंद्र बात्रा यांनी नवी दिल्लीत जाहीर केले. खेळाडू व अन्य व्यक्तींना समारंभपूर्वक हे बक्षीस दिले जाणार आहे, असेही बात्रा यांनी सांगितले.