क्रिकेट हा धावा आणि विकेटचा खेळ. कोणत्या खेळाडूने किती शतकं ठोकली, कोणत्या गोलंदाजाने किती विकेट घेतल्या. असे अनेक विक्रम क्रिकेट विश्वात रचले जातात. कोणत्याही फलंदाजाला आपण आपल्या करिअरमध्ये केव्हाच शून्यावर बाद व्हायचे नसते. पण अनेकदा फलंदाजांना कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो आणि अनेकदा गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे फलंदाज पहिल्याच चेंडूवर तंबूत माघारी येतात. मात्र, यास एक माजी भारतीय फलंदाज अपवाद आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा आपल्या संपूर्ण वनडे करिअरमध्ये एकदाही शून्यावर बाद झालेले नाहीत. शर्मा यांच्या नावावर या अनोख्या विक्रमाची नोंद आहे.

११ ऑगस्ट १९५४ साली लुधियानामध्ये जन्मलेल्या यशपाल शर्मा यांनी १९७८ साली पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते. याशिवाय, यशपाल हे १९८३ साली विश्वविजेच्या भारतीय संघाचेही सदस्य होते. आपल्या सात वर्षांच्या वनडे करिअरमध्ये जगातला एकही गोलंदाज यशपाल शर्मा यांना शून्यावर बाद करू शकलेला नाही. संघात मधल्या फळीची जबाबदारी सांभाळणाऱ्या यशपाल शर्मा यांनी ४२ वनडे सामन्यांमध्ये ६३.०२ च्या स्ट्राईक रेटने ८८३ धावा केल्या आहेत.

yashpal-sharma

 

या यष्टीरक्षक फलंदाजाचा ८३ हा सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा आकडा राहिला आहे. याशिवाय त्यांनी चार अर्धशतकं देखील ठोकली आहेत. कसोटी आकडेवारी पाहायची झाली तर यशपाल शर्मा यांनी ३७ सामन्यांमध्ये दोन शतक आणि ९ अर्धशतकं ठोकली आहेत. कसोटीमध्ये त्यांच्या नावावर १६९६ धावा जमा आहेत.