तब्बल आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्तानच्या मैदानावर आतंरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु होतयं. पाकिस्तानच्या मैदानातील आंतरराष्ट्रीय पर्वाच्या पुनरागमनाचे आफ्रिदीने स्वागत केलंय. पुढील महिन्यात पाकिस्तान इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात टी-२० सामन्याने पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात होत आहे. लाहोरमध्ये रंगणाऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ड्युप्लिसी वर्ल्ड इलेव्हनचे नेतृत्व करणार आहे. आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नव्या पर्वाचे स्वागत करताना भारतीय खेळाडूं या सामन्यात सहभागी नसल्याची खंत व्यक्त केली. वर्ल्ड इलेव्हनच्या संघातून भारतीय खेळाडूंनी मैदानात उतरायला हवे होते, अशी भावना आफ्रिदीने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.

आफ्रिदीने ट्विटमध्ये लिहिलंय की, पाकिस्तान क्रिकेट मंडळ आणि आयसीसीने एकत्रितपणे घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आगामी मालिकेत भारतीय खेळाडूंनी देखील सकारात्मकता दाखवायला हवी होती. वर्ल्ड इलेव्हन आणि पाकिस्तान यांच्यात १२, १३ आणि १५ सप्टेंबरला तीन टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. २००९ साली श्रीलंकन संघावर लाहोर मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यावर आयसीसीने बंदी घातली होती. या ८ वर्षांत पाकिस्तानात आयसीसीची एकही स्पर्धा खेळवली गेली नाही. याकाळात पाकिस्तानने दुबईच्या मैदानावर आपले सामने खेळले.

पाकिस्तानचा संघ- सरफराज अहमद (कर्णधार), फखर झमान, अहमद शहजाद, बाबर आझम, शोएब मलिक, उमर अमिन, इमाद वसीम, शदाब खान, मोहम्मद नवाझ, फहिम अशरफ, हसन अली, अमीर यमीन, मोहम्मद आमिर, रुमन रईस, उस्मान खान, सोहेल खान

वर्ल्ड इलेव्हन संघ- फाफ ड्युप्लिसी, हाशिम आमला, जॉर्ज बेली, पॉल कॉलिंवूड, बेन कटिंग, ग्रॅट इलियट, तमिम इकबाल, डेव्हिड मिलर, टिम पेन, तिसारा परेरा, डॅरेन सॅमी, सॅम्युअल बद्री, मोर्ने मॉर्कल, इम्रान ताहिर