भारतीय महिला वन-डे संघाची कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू मिताली राज सध्याच्या संकटकाळात पुढे आलेली आहे. करोनाविरुद्ध लढ्यात मितालीने १० लाख रुपयांचा निधी सरकारी यंत्रणांना देण्याचं ठरवलं आहे. मितालीने ५ लाखांची रक्कम पंतप्रधान सहायता निधीला तर ५ लाखांची रक्कम तेलंगणा सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचं ठरवलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मितालीने या मदतीसंदर्भातली घोषणा केली.

आतापर्यंत बजरंग पुनिया, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, रिचा घोष यासारख्या अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी करोनाविरोधातील लढ्यात सरकारी यंत्रणांना आपापल्या परीने मदत केली आहे. इरफान आणि युसूफ या बंधूंनी बडोद्यात गरजू व्यक्तींना ४ हजार मास्क मोफत वाटले आहेत. देशात करोनामुळे गंभीर परिस्थिती असताना भारतीय खेळाडूंनी आपलं सामाजिक भान राखत पुढे येऊन केलेली मदत ही वाखणण्याजोगी आहे.

दरम्यान दिवसेंदिवस देशात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु, कोलकाता यासारख्या महत्वाच्या शहरात करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. भारतात काही लोकांना यामुळे आपले प्राणही गमवावे लागले आहेत. परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.