विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला पेपर सहजपणे सोडवल्यानंतर आता भारतासमोर सर्वात कठीण पेपर असणार आहे. विश्वचषकात भारतावर अधिराज्य गाजवणारा ऑस्ट्रेलिया संघ सध्या डळमळीत अवस्थेत असला तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताला रविवारी केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणाऱ्या सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

भारताने सलामीच्या लढतीत आत्मविश्वासाने खचलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सहा गडी राखून पराभव केला. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या बंदीनंतर जवळपास वर्षभर संघर्ष करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने गेल्या काही महिन्यांत आपली कामगिरी उंचावली आहे. विश्वचषक स्पर्धेतही अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे सामनेजिंकत ऑस्ट्रेलियाने आपण सहाव्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.

भारताला मायदेशातील अखेरच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. वॉर्नर आणि स्मिथ यांच्या अनुपस्थितीतही भारतातील पाटा खेळपट्टय़ांवर ऑस्ट्रेलियाने कुलदीप यादव आणि यजुर्वेद्र चहल यांच्या फिरकी माऱ्याला प्रभावीपणे तोंड दिले होते. आता वॉर्नर, स्मिथ यांच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियाची फलंदाजीची फळी भारताविरुद्ध पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. पहिल्या सामन्यात भारताने तिन्ही आघाडय़ांवर वर्चस्वपूर्ण खेळ केला होता. जसप्रीत बुमराने आफ्रिकेला सुरुवातीला दोन धक्के दिल्यानंतर चहलने त्यांची फलंदाजी नेस्तनाबूत केली होती. त्यानंतर रोहित शर्माने चिवट शतकी खेळी करत भारताला आरामात विजय मिळवून दिला होता.

मोहम्मद शमीचे पुनरागमन

फिरकी माऱ्याला हाताळण्याची क्षमता दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांकडे नसल्यामुळे सलामीच्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली होती. मात्र खेळपट्टीचे स्वरूप पाहता तसेच जसप्रीत बुमरा आणि शमी यांच्या स्विंग माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज गडबडू शकतात, हे लक्षात घेऊन अंतिम संघात शमीला स्थान मिळणार आहे. भारताने दोन फिरकीपटूंना कायम राखण्याचे धोरण ठरवले तर भुवनेश्वर कुमारला अंतिम संघातील स्थान गमवावे लागणार आहे. दोन फिरकीपटूंपैकी एकाला संधी देण्याचे ठरवले तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या कुलदीपची निवड होऊ शकते.

केदारच्या स्थानाविषयी साशंकता

केदारची ऑफ-स्पिन गोलंदाजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रभावी ठरणार नाही. उलट त्याच्या गोलंदाजीवर मोठय़ा फटक्यांची बरसात होऊ शकते. तसेच मिचेल स्टार्कसारख्या वेगवान गोलंदाजाच्या उसळत्या चेंडूचा सामना करताना तो असमर्थ ठरत आहे. त्यामुळेच त्याच्या संघातील स्थानाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विजय शंकरची मध्यमगती गोलंदाजी आणि सावध फलंदाजी यामुळे त्याचा विचार होऊ शकतो.

शिखर धवनच्या अपयशाची चिंता

गेल्या अनेक महिन्यांपासून भारताचा सलामीवीर शिखर धवन खराब कामगिरीतून जात आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये धवन नेहमीच प्रतिस्पर्धी संघांसाठी धोकादायक ठरला असून अद्याप त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही सराव सामन्यात तसेच सलामीच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या धवनला ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात सूर गवसेल, अशी अपेक्षा केली जात आहे. जर अजून काही सामन्यात धवन अपयशी ठरला तर लोकेश राहुलला सलामीला संधी देऊन विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर उतरवण्याचा पर्याय भारतीय संघ व्यवस्थापनासमोर असेल. विराट कोहलीला पहिल्या सामन्यात मोठी खेळी करता आली नव्हती, त्यामुळे त्यानेही फलंदाजीत योगदान द्यावे, अशी अपेक्षा आहे.

अलीकडेच दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध चांगले यश मिळवले आहे. मात्र रविवारी दोघांची कामगिरी कशी होते, यावर सामन्याचा निकाल अवलंबून राहील. पहिल्या विजयाने आमचा आत्मविश्वास उंचावला असून कामगिरीत सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न राहील.

– रोहित शर्मा, भारताचा फलंदाज

सामना क्र. 14

भारत वि. ऑस्ट्रेलिया

स्थळ : द ओव्हल स्टेडियम, लंडन  ’सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २,

स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरेंड्रॉफ, अ‍ॅलेक्स केरी (उपकर्णधार व यष्टीरक्षक), नॅथन कोल्टर नाइल, पॅट कमिन्स उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

आमनेसामने

एकदिवसीय   

सामने : १३६, ऑस्ट्रेलिया: ७७,

भारत : ४९, टाय / रद्द : ०/१०

विश्वचषकात    

सामने : ११, ऑस्ट्रेलिया: ८,

भारत : ३, टाय / रद्द : ०

खेळपट्टीचा अंदाज

संपूर्ण दिवस सूर्यप्रकाश असला तरी दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. ओव्हल स्टेडियमवर दुसऱ्यांदा फलंदाजी करणे अवघड असताना नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. कोरडी खेळपट्टी आणि दूरवर असलेल्या सीमारेषेमुळे फिरकीपटूंची भूमिका मोलाची ठरणार आहे.