बेंगळूरु : श्रीहरी नटराज, साजन प्रकाश, लिकिथ एस. पी. आणि वीरधवल खाडे यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने आशियाई वयोगट जलतरण स्पध्रेतील पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर मिडले रिले सांघिक प्रकारात भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.भारतीय संघाने ३:४६.४९ सेकंद अशी वेळ नोंदवत थायलंडच्या (३:४८.८९ सेकंद) संघावर मात केली. हाँगकाँगला (३:५३.९९ सेकंद) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

श्रीहरीने बॅकस्ट्रोकमध्ये भारताला दमदार सुरुवात करून देताना ५६.५५ सेकंद अशी वेळ नोंदवली. साजनने बटरफ्लायमध्ये ५४.४० सेकंदांची वेळ गाठताना भारताची आघाडी टिकवली. मग ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये लिकिथने १:०२.४७ अशी वेळ साधली. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात वीरधवनने ५३ सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले.

कुशाग्र, नटराजला सुवर्ण

कुशाग्र रावतने ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात चौथ्या वैयक्तिक सुवर्णपदकाची नोंद केली, तर श्रीहरी नटराजने १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात वैयक्तिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. कुशाग्रने ३:५५.८१ सेकंद अशी वेळ नोंदवली. साजन प्रकाशने २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात २:००.३८ सेकंदांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.