दिगंबर शिंदे
सांगली : नंदू नाटेकर यांची सांगली ही जन्मभूमी.  शालेय अभ्यासापेक्षा खेळांचीच अधिक आवड त्यांना होती. त्यामुळेच पहिले अर्जुन पुरस्कारप्राप्त नाटेकर यांच्या निधनामुळे सांगलीच्या क्रीडाविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.

सांगलीमध्ये १२ मे १९३३ रोजी आजोळी जन्म झालेल्या नाटेकरांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण येथील सिटी हायस्कूल व सांगली हायस्कूलमध्ये झाले. मात्र अभ्यासात रस नसलेल्या नाटेकरांनी क्रीडा क्षेत्रामध्ये देदीप्यमान कामगिरी केली. चार वर्षांपूर्वी सांगली हायस्कूलच्या शताब्दी वर्षांनिमित्त ते सांगलीत आले होते. त्यांच्या हस्ते शाळेतील गुणी मुलांचे कौतुकही करण्यात आले होते.

नाटेकर यांनी शालेय जीवनामध्ये १९४४ ते १९५०पर्यंत बॅडमिंटनचे प्राथमिक धडे सांगलीतील जिमखान्याच्या कोर्टवर गिरवले. त्यानंतर त्यांनी मुंबईला प्रयाण केले. १९५३मध्ये अमेरिकेतील अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पध्रेसाठी जात असताना आíथक भार उचलण्यासाठी जिमखान्याने प्रदर्शनीय सामन्याचे आयोजनही सांगलीत केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा कामगिरीच्या जोरावर त्यांना पहिला अर्जुन पुरस्कार १९६१मध्ये मिळाला होता.

‘‘क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोच्च कामगिरी करण्याची जिद्द कशी असावी, याचा सांगलीचे सुपुत्र नंदू नाटेकर आदर्श होते,’’ अशी प्रतिक्रिया क्रीडा प्रशिक्षक एस. एल. पाटील यांनी व्यक्त केली, तर ‘‘बॅडमिंटन खेळामध्ये सांगलीचे नाव जागतिक पातळीवर नेणारे नाटेकर हे सांगलीतील खेळाडूंना नेहमीच प्रेरणादायी राहतील,’’ अशी प्रतिक्रिया सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष मकरंद चितळे यांनी व्यक्त केली.