क्रिकेट हेच माझे जीवन आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरही माझे क्रिकेट सुरूच राहील. ट्वेन्टी-२० लीग असो किंवा प्रशिक्षण, मला क्रिकेटमध्येच रमायला आवडेल. निवृत्तीनंतरही क्रिकेटचाच ध्यास माझ्या मनात कायम असेल, असे मत भारताचा फिरकीपटू रमेश पोवारने व्यक्त केले.
ल्ल काही दिवसांपूर्वी तू निवृत्तीचा निर्णय जाहीर केलास, यामागे कोणती कारणे होती?
मी क्रिकेटचा पुरेपूर आनंद लुटला आहे. आता युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी, असे मला वाटले. गुजरातचा संघही चांगली कामगिरी करतो आहे, त्यामुळे मी हा निवृत्तीचा निर्णय घेतला.
ल्ल मास्टर्स चॅम्पियन्स लीग, हे निवृत्तीमागचे कारण आहे का?
निवृत्तीच्या काही कारणांपैकी हे एक कारण नक्कीच आहे. कारण मी क्रिकेटशिवाय राहू शकत नाही. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावरही लीग खेळायला मिळणे ही एक सुवर्णसंधी आहे. त्याचबरोबर मला क्रिकेट प्रशिक्षणही सुरू करायचे आहे. काही व्यक्तींशी सल्लामसलत करून मी प्रशिक्षण सुरू करणार आहे.
ल्ल तू बरीच वर्षे मुंबईची सेवा केलीस, पण त्यानंतर तुला गेली काही वर्षे दुसऱ्या संघांकडून खेळावे लागले. मुंबईच्या बऱ्याच खेळाडूंचे असे होते, त्याला काय कारण वाटते?
माझ्या मते मुंबईला नवीन संघाची उभारणी करायची होती. त्यामुळे मीच संघातून बाहेर पडलो. त्यापूर्वी मला गंभीर दुखापतही झाली होती. पण संघाची उभारणी करताना अनुभवी खेळाडूंचीही मदत होऊ शकते. पण संघ व्यवस्थापनाने मला याबाबत काहीही सांगितले नाही. संघ व्यवस्थापनाने याबाबत अन्य खेळाडूंना स्पष्टपणे सांगायला हवे.
ल्ल तुझ्या कारकीर्दीचे कसे वर्णन करशील?
सारे काही स्वप्नवत आहे. मी रबरी चेंडूने क्रिकेट खेळायचो. तेव्हा मला रमाकांत आचरेकर सरांनी हेरले. माझ्यावर मेहनत घेतली. त्यानंतर क्लब क्रिकेट ते रणजी, स्थानिक क्रिकेट, भारत ‘अ’ आणि भारतीय संघ हा प्रवास अद्भुत असाच होता. आचरेकर सर नसते, तर मला एवढी चांगली कारकीर्द घडवता आली नसती. सचिन तेंडुलकरला मी फक्त टीव्हीवर पाहिले नाही, त्याच्याबरोबर खेळता आले, हेच माझ्यासाठी फार मोठे आहे.
ल्ल कारकीर्दीचा शेवट मैदानात व्हायला हवा होता, हे शल्य बोचत नाही का?
नक्कीच नाही. कारण मी क्रिकेटचा पुरेपूर आनंद लुटला आहे. त्यामुळे खेळताना निवृत्त झालो नाही, याचे शल्य मला नाही. क्रिकेटने मला आयुष्यात निस्सीम आनंद दिला आहे.
ल्ल वानखेडेवर निवृत्ती जाहीर करण्यामागे काय कारण होते?
खरे तर हे सारे अनाहुतपणे झाले. मी फक्त रणजी सामना पाहायला आलो होतो. त्यावेळी पत्रकारांनी मला विचारले आणि मी निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. सुदैवाने ज्या वानखेडेवर मी क्रिकेटची सुरुवात केली, त्याच मैदानात निवृत्तीचा निर्णय घेणे हा चांगला योगायोग होता.
ल्ल तू ज्याप्रकारे चेंडूला उंची द्यायचास, तसे सध्याचे फिरकीपटू देताना दिसत नाहीत, याबद्दल काय वाटते?
पूर्वीचे क्रिकेट फार सुंदर होते. त्यावेळी प्रत्येक चेंडूवर चौकार किंवा षटकार मारायचा प्रयत्न नसायचा. त्यावेळी फलंदाजीची शैली, दर्जा उत्तम होता. पण आत्ताचे क्रिकेट बदलले आहे. त्यामुळे फिरकीपटू चेंडूला जास्त उंची देत नाहीत. माझ्या मते फिरकीपटू चेंडूला उंची दिल्याशिवाय बळी मिळवू शकत नाहीत. पण जमाना बदलला तसे क्रिकेट बदलले आणि फिरकी गोलंदाजीची शैलीदेखील. त्यामुळे आताच्या फिरकीपटूंना जे योग्य वाटते तेच ते करतात.