|| ऋषिकेश बामणे

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा १२वा हंगामसुद्धा नेहमीप्रमाणे धूमधडाक्यात अंतिम फेरीच्या वळणावर येऊन ठेपला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन सर्वोत्तम संघांपैकी रविवारी कोणता संघ चौथ्यांदा विजेतेपदाचा चषक उंचावणार, याची उत्सुकता एव्हाना शिगेला पोहोचली आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत चाहत्यांमध्ये ‘आयपीएल’विषयीचे आकर्षण घटले आहे. ‘सुपर ओव्हर’पर्यंत रंगलेले दोन सामने, वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा बोलबाला, पंचांकडून झालेल्या असंख्य चुका आणि त्यावर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहलीचे आक्रमक प्रत्युत्तर या सर्व गोष्टींमुळे ही ‘आयपीएल’ संस्मरणीय ठरली. त्याचप्रमाणे वैयक्तिक कामगिरी सुधारण्यात अयशस्वी ठरलेल्या भारतीय खेळाडूंना विश्वचषकापूर्वी सावध इशारादेखील मिळाला आहे.

कोहली, रोहित अपयशी; राहुल-पंडय़ाची छाप

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाचे दोन प्रमुख आधारस्तंभ म्हणजे कोहली व रोहित. मात्र दोघांनाही यंदाच्या हंगामात लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. रोहितने अंतिम फेरीपूर्वीच्या १४ सामन्यांत अवघी दोन अर्धशतके झळकावली आहेत, तर कोहलीने दोन अर्धशतके व एका शतकासह ३२८ धावा केल्या. मुख्य म्हणजे सलग दुसऱ्या पर्वात कोहलीच्या नेतृत्वगुणातील मर्यादा स्पष्ट झाल्या. मात्र वर्षांच्या सुरुवातीस ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे निलंबनाची शिक्षा भोगलेले लोकेश राहुल आणि हार्दिक पंडय़ा यांनी त्यांचे सर्वस्व पणाला लावून गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवली. राहुलने (५९३) सर्वाधिक धावा केल्या, तर अष्टपैलू पंडय़ाने १५ सामन्यांतून ३८६ धावा आणि १४ बळींसह दमदार कामगिरी करतानाच विश्वचषकासाठी आपण सज्ज आहोत, हे सर्वाना दाखवून दिले. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ३४ चेंडूंत साकारलेली ९१ धावांची खेळी यंदाच्या ‘आयपीएल’ची सवरेत्कृष्ट खेळी ठरली. त्याशिवाय शिखर धवन (५२१) आणि अनुभवी धोनी (४१४) यांनीही चमकदार खेळ केला.

जसप्रीत बुमरा (१७ बळी), यजुर्वेद्र चहल (१८) आणि मोहम्मद शमी (१९) यांना वगळता इतर भारतीय गोलंदाजांची कामगिरी संमिश्र स्वरूपाची झाली. भुवनेश्वर कुमार (१२) या वेळी सातत्याने चाचपडताना आढळला, तर फिरकीपटू कुलदीप यादवसाठी हा हंगाम (४) खराब ठरला. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा (१५ बळी) कुलदीपच्या तुलनेत अधिक प्रभावी वाटला.

सदोष पंचगिरीचा फटका

क्रिकेट किंवा कोणत्याही क्रीडा प्रकारात पंचांचा निर्णय अंतिम मानला जातो, मात्र त्यासाठी पंचांनीसुद्धा त्या दर्जाची पंचगिरी करणे अपेक्षित असते. दर वर्षीप्रमाणे यंदासुद्धा पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका अनेक संघांना बसला. मुंबई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु यांच्यातील सामन्यात लसिथ मलिंगाने टाकलेला अखेरचा चेंडू पंच ‘नो बॉल’ देण्यात अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना कोहलीच्या टीकेसही सामोरे जावे लागले. राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात नो बॉल देऊनही तो रद्द करणाऱ्या पंच उल्हास गंधे यांच्यावर रागाच्या आवेशात तोंडसुख घेणारा धोनीही चाहत्यांना पहिल्यांदाच पाहायला मिळाला.

वॉर्नर-स्मिथचे पुनरागमन आणि विंडीजचे वर्चस्व

गतवर्षी मार्च महिन्यात चेंडू फेरफार प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय तसेच ‘आयपीएल’ सामन्यांमध्ये खेळण्यावर बंदी घालण्यात आलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दमदार पुनरागमन केले. विशेषत: वॉर्नरने अवघ्या १२ सामन्यांत तब्बल ८ अर्धशतके व एका शतकासह ६९२ धावा फटकावून तिसऱ्यांदा ‘ऑरेंज कॅप’ पटकावण्याच्या दिशेने कूच केली आहे. स्मिथनेही १२ सामन्यांत तीन अर्धशतक झळकावण्याबरोबरच नेतृत्व कौशल्यावर राजस्थानला बाद फेरीच्या आशा दाखवल्या होत्या. या दोघांच्या पुनरागमनामुळे विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलिया संघ बलवान झाला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंव्यतिरिक्त आंद्रे रसेल (५१०), ख्रिस गेल (४९०), किरॉन पोलार्ड (२३८), सुनील नरिन (१२ बळी) यांनी पुन्हा एकदा ‘आयपीएल’मधील विंडीज खेळाडूंचे महत्त्व अधोरेखित केले.

डावललेल्यांची चमक

विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान न मिळालेल्या ऋषभ पंत (४८८) आणि श्रेयस अय्यर (४६३) या दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी संपूर्ण हंगामात दिमाखदार खेळ करत निवड समितीला पुनर्विचार करायला लावला. त्यातच केदार जाधवच्या (१६२) दुखापतीमुळे भारतीय संघात चिंतेचे ढग दाटले. अंबाती रायुडू (२८१) या स्पर्धेत काहीसा मागे पडला आहे. गोलंदाजीत खलिल अहमदने अवघ्या नऊ सामन्यांत १९ बळी पटकावत आपले नाणे खणखणीत वाजवले. त्याशिवाय हॅट्ट्रिकची किमया साधणारा फिरकीपटू श्रेयस गोपाळ, १७ वर्षीय रियान पराग (७ सामन्यांत १६१ धावा) आणि लेग-स्पिनर राहुल चहर (१२ बळी) यांची कामगिरीदेखील कौतुकास्पद आहे.