गेले काही वर्ष भारतीय संघाबाहेर असलेल्या युवराज सिंहची आज आयपीएलमधून गच्छंती होता होता वाचली आहे. पहिल्या सत्रात कोणत्याही संघाने बोली न लावल्यामुळे न विकल्या गेलेल्या युवराजला दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतलं आहे. युवराजने आपली मूळ किंमत २ कोटींवरुन १ कोटीवर आणल्यानंतर मुंबईने युवराजला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. मागचा हंगाम पंजाबकडून खेळणाऱ्या युवराजला आपल्या कामगिरीत फारशी चमक दाखवता आलेली नव्हती. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवण्याचं आव्हान युवराजसमोर असणार आहे. NEW SIGNING Yuvraj Singh Price: ₹ 1 Crore #CricketMeriJaan #IPLAuction— Mumbai Indians (@mipaltan) December 18, 2018 आयपीएलच्या बाराव्या हंगामात, गोलंदाजांनी आपला वरचष्मा गाजवला आहे. गतवर्षी सर्वात महागडा खेळाडू म्हणून चर्चेत आलेल्या जयदेव उनाडकटला यंदाही राजस्थान रॉयल्सने ८ कोटी ४० लाखांच्या बोलीवर आपल्या संघात कायम राखलं आहे. याचसोबत मोहम्मद शमीला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ४ कोटी ८० लाखांच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं आहे. लसिथ मलिंगाने यंदाच्या हंगामात खेळाडूच्या रुपात मुंबईच्या संघाकडून पुनरागमन केलं आहे. वरुण अॅरोनला राजस्थान रॉयल्सने २ कोटी ४० लाख तर मोहीत शर्माला चेन्नईने ५ कोटींच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं आहे. याचसोबत तामिळनाडूच्या वरुण चक्रवर्तीनेही अनपेक्षितपणे ८ कोटी ४० लाखांची बोली घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने वरुणवर ८ कोटी ४० लाखांची बोली लावली. परदेशी खेळाडूंमध्ये इंग्लंडच्या सॅम करनला सर्वाधिक बोली लागली. पंजाबच्याच संघाने करनवर ७ कोटी २० लाख बोली लावलसी त्याआधी सुरुवातीच्या सत्रात विंडीजच्या खेळाडूंनी वर्चस्व कायम राखलं आहे. विंडीजचे शेमरॉन हेटमायर, कार्लोस ब्रेथवेट आणि निकोलस पुरन यांच्यावर संघमालकांनी कोट्यवधी रुपयांच्या बोली लावल्या आहेत. तुलनेने भारतीय खेळाडूंना पहिल्या सत्रात आपली छाप पाडता आली नाही. आपली मुळ किंमत १ कोटी रुपयापर्यंत खाली आणुनही युवराज सिंहला संघात घेण्यात कोणत्याही मालकाने उत्सुकता दाखवलेली नाहीये. भारताच्या हनुमा विहारी आणि अक्षर पटेलला दिल्ली कॅपिटल्स संघाने अनुक्रमे २ कोटी आणि ५ कोटी रुपयांची बोली लावली आहे. शिमरॉन हेटमायरला ४ कोटी २० लाखांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, टी-२० संघाचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटला ५ कोटी रुपयांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने तर यष्टीरक्षक निकोलस पुरनला ४ कोटी २० लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने विकत घेतलं आहे. याव्यतिरीक्त लॉकी फर्ग्युनस १ कोटी ६० लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून, विंडीजचा शेर्फेन रुदफोर्ड २ कोटींच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे.