IPL 2019 स्पर्धेचा सध्या शेवटचा टप्पा सुरु आहे. या स्पर्धेतील केवळ २ सामन्यानंतर IPL ला यंदाचा नवा विजेता मिळणार आहे. आज (शुक्रवारी) क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली आणि चेन्नई या दोन संघामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ मुंबईच्या संघाविरुद्ध १२ मे रोजी अंतिम सामना खेळणार आहे.

आजच्या सामन्यात मुख्य लक्ष असेल ते गुरु महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा शिष्य ऋषभ पंत या दोघांच्या कामगिरीवर. ऋषभ पंत याने बाद फेरीच्या सामन्यात फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे आजच्या सामन्यात गुरु धोनीच्या रणनीतीविरुद्ध ऋषभ कसा कळेल करतो यावर साऱ्यांचे लक्ष आहे. धोनीनेही आपल्या संघाला विजयी करण्यासाठी महत्वाची खेळी केली आहे. पण या बरोबरच क्रिकेट रसिकांचे लक्ष चेन्नईचा चतुर मध्यमगती गोलंदाज ड्वेन ब्राव्हो एका विक्रमाकडेही साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

चेन्नईकडून गोलंदाजी करताना सर्वाधिक बळी घेणाऱ्या यादीत ब्राव्हो अव्वल आहे. त्याने आतापर्यंत ९९ बळी टिपले आहेत. त्यामुळे चेन्नईकडून खेळताना बळींचे शतक पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ १ गडी बाद करण्याची गरज आहे. जर त्याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात एक बळी टिपला, तर चेन्नईकडून बळींचे शतक पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे. या यादीत ९० बळींसह रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण आता त्याने चेन्नईचा संघ सोडला असून तो पंजाब संघाचे नेतृत्व करत आहे.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या क्वालिफायर १ मध्ये विजय मिळवून मुंबईच्या संघाने अंतिम सामना गाठला. चेन्नईच्या संघाविरुद्ध झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात मुंबईने चेन्नईला ६ गडी राखून सहज  पराभूत केले. १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतकी खेळी केली. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यामुळे ज्या संघाला अंतिम फेरी गाठायची असेल, त्या संघाने आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे.