२०१९ साली होणाऱ्या IPL स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रीया डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे सर्व संघमालकांना Retaintion Policy अंतर्गत खेळाडूंची देवाण-घेवाण करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार १५ नोव्हेंबर ही देवाण-घेवाणीची अखेरची तारीख होती. या वेळेत गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या २५ सदस्यांच्या संघातून इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूड, क्षितिज शर्मा आणि कनिष्क सेठ यांना करारमुक्त केले.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चेन्नई सुपरकिंग्जने याची माहिती दिली होती. पण गतवर्षी केदार जाधव जायबंदी झाल्यानंतर पर्याय म्हणून संघात घेतलेल्या डेव्हीड विलीला चेन्नईने संघात कायम राखले. त्या बरोबरच अंतिम फेरीत संघातून वगळण्यात आलेला अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यालाही संघात कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हरभजन सध्या आनंदी असून त्याने या निर्णयाचे स्वागत मानण्यासाठी खास तामिळ भाषेत ट्विट केले आहे.

प्रिय तामिळ चाहत्यांनो, मी पुनरागमन केले, तर ते फक्त राजाप्रमाणेच असेल. सगळ्यांना सांगा, मी परत आलोय! चला .. प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करू या आणि इतिहास घडवू या!, असा या ट्विटचा मराठी भाषेतील अर्थ आहे.