तारांकित क्रिकेटपटूंचा मुंबई आणि बेंगळूरुमध्ये आज सामना

बेंगळूरु : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरावरील दुखापतीचे मळभ दूर झाले असून, तो गुरुवारी होणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्स आणि बेंगळूरु या तारांकित क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या संघांमधील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि गोलंदाज म्हणजेच कोहली आणि बुमरा यांच्यातील संघर्ष क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात बुमराच्या खांद्याला झालेली दुखापत चिंतेचा विषय ठरली होती. मात्र आता तो दुखापतीतून सावरला असून, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगासुद्धा चमूत सामील झाला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचा आत्मविश्वास उंचावला आहे. श्रीलंकेत ४ ते ११ एप्रिल या कालावधीत देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा होणार आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने ही स्पर्धा निवड चाचणी असेल. परंतु श्रीलंका क्रिकेट मंडळाने मंगळवारी त्याला ‘आयपीएल’ खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्या साथीला मिचेल मॅक्क्लिनॅघनसुद्धा असेल. त्यामुळे कोहली, एबी डी’व्हिलियर्स आणि शिम्रॉन हेटमायर यांना मुंबईच्या भेदक माऱ्याचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई आणि बेंगळूरु या दोन्ही संघांनी आपले सलामीचे सामने गमावले आहेत. या लढतींमध्ये फलंदाजीत अपयशी ठरलेल्या कोहली आणि रोहितच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल. ३७ वर्षीय युवराजने दिल्लीविरुद्ध दिमाखदार अर्धशतकासह हंगामाचा प्रारंभ केला आहे.

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात १७.१ षटकांत ७० धावांत गारद झालेल्या बेंगळूरुच्या फलंदाजांना आपली कामगिरी उंचावावी लागणार आहे. लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहल हा बेंगळूरुच्या गोलंदाजीच्या फिरकी माऱ्याची धुरा वाहील.

’ सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १

’ मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमरा, राहुल चहर, बेन कटिंग, पंकज जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सिद्धेश लाड, एव्हिन लेविस, लसिथ मलिंगा, मयांक मरकडे, मिचेल मॅक्क्लिनॅघन, अ‍ॅडम मिल्ने, हार्दिक पंडय़ा, किरॉन पोलार्ड, अनुकूल रॉय, रसिक सलाम, युवराज सिंग, अनमोलप्रीत सिंग, बिरदर शरण, आदित्य तरे, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक).

’ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, नॅथन कोएल्टर-नाइल, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज, हेन्रिच क्लासिन (यष्टीरक्षक), मोईन अली, कॉलिन डी ग्रॅण्डहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.