IPL मधील गतविजेता संघ मुंबई इंडियन्स यांनी बुधवारी एक नवा खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करून घेतला आहे. मुंबईच्या संघात धवल कुलकर्णीची घरवापसी झाली आहे. राजस्थान संघातून ट्रेड करून धवल कुलकर्णीला मुंबई इंडियन्सचे तिकीट मिळाले आहे. मुंबईच्या संघाने आधी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला संघात घेतले होते. त्या पाठोपाठ त्यांनी मराठमोळ्या धवल कुलकर्णीलाही संघात घेत संघाचा वेगवान गोलंदाजीचा ताफा अजून तगडा केला आहे. याशिवाय मुंबईकडे जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा हे दोन गोलंदाज आहेत.

याशिवाय, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला IPL 2020 साठी मुंबईने आपल्या संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी बोल्ट हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळला होता. पण या हंगामात दिल्लीने बोल्टला मुंबई इंडियन्सशी ट्रेड केले आहे.

२०१४ मध्ये बोल्टने IPL मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ३३ सामन्यात त्याने ३८ बळी टिपले. २०१८ साली त्याला ‘दिल्ली कॅपिटल्स’ संघाने जवळपास २ कोटी २५ लाख रुपयांना खरेदी केले होते. दिल्लीकडून दोन हंगामात खेळल्यानंतर बोल्ट आता बोल्ट IPL 2020 मध्ये मुंबईकडून खेळणार आहे.

चार वेळा विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सने यापूर्वी विंडीजच्या शेरफेन रदरफोर्ड याला संघात समाविष्ट करून घेतले होते. बोल्टने २०१८ मध्ये दिल्लीसाठी १८ सामन्यात १८ बळी टिपले. त्यानंतर IPL 2019 मध्ये त्याला फारशी चांगली कामगिरी करणे शक्य झाले नाही. त्या पूर्ण हंगामात त्याने पाच सामन्यात पाच बळी टिपले.

याशिवाय फिरकीपटू जगदीशा सुचित याला किंग्ज इलेव्हन पंजाबशी दिल्ली संघात ट्रेड करण्यात आले आहे. दिल्लीने रविचंद्रन अश्विन याच्यासह सूचितचा करार करण्याचा निर्णय घेतला आहे. IPL च्या पुढील आवृत्तीत भारताचा वेगवान गोलंदाज अंकित राजपूत राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. राजस्थानकडून खेळणार्‍या कृष्णाप्पा गौतम किंग्ज इलेव्हन पंजाबचे तिकीट मिळाले आहेत.