जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयसमोर यंदाच्या आयपीएल हंगामाबद्दलचा पेच सुरु आहे. करोनामुळे बीसीसीायने यंदाचा आयपीएल हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे, त्यामुळे बीसीसीआयने या हंगामाचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे. आतापर्यंत श्रीलंका आणि UAE या दोन क्रिकेट बोर्डांनी बीसीसीआयला आयपीएलचं आयोजन करण्याची तयारी दाखवली होती. यानंतर न्यूझीलंडनेही आयपीएलचं आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. पण स्पर्धेचं आयोजन भारतात करण्यासाठी बीसीसीआय पहिले प्रयत्न करणार असून परिस्थितीमध्ये सुधारणा न झाल्यास आयोजन भारताबाहेर करण्याबाबत विचार केला जाईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

“आयोजनासाठी बीसीसीआय पहिले भारताचाच विचार करणार आहे. परिस्थिती नियंत्रणात आली नाही तरच स्पर्धा देशाबाहेर आयोजित करण्यावर विचार केला जाईल. आतापर्यंत बीसीसीआयकडे श्रीलंका, UAE, न्यूझीलंड या तीन क्रिकेट बोर्डांनी आयपीएलच्या आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या पुढील बैठकीत याबद्दल विचार केला जाईल आणि मग अंतिम निर्णय होईल.” Reuters शी बोलताना बीसीसीआय खजिनदार अरुण धुमाळ यांनी बीसीसीआयची बाजू स्पष्ट केली.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी यंदाची स्पर्धा देशाबाहेर जाणार असल्याचं सांगितलं होतं. ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषकाबद्दल निर्णय घेण्यासाठी आयसीसी विलंब करत असल्यामुळे बीसीसीआयला आयपीएल आयोजनाबद्दल निर्णय घेण्यासाठी उशीर होत आहे. बीसीसीआयने याबद्दल नाराजीही बोलून दाखवली. याआधीही २००९ आणि २०१४ साली आयपीएलचं आयोजन अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि युएई मध्ये करण्यात आलं होतं. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये बीसीसीआय यावर नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.