चेन्नईच्या धोनी ब्रिगेडनं विराटसेनेचा विजयरथ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रोखला. चेन्नईनं ६९ धावांनी हा सामना जिंकला. या विजयासाह धोनी ब्रिगेड आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे. या सामन्यात चेन्नईच्या रविंद्र जडेजानं आक्रमक फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली. हर्षल पटेलनं टाकलेल्या शेवटच्या षटकात ३७ धावा ठोकल्या. यात ५ षटकार आणि १ चौकाराचा समावेश आहे. रविंद्र जडेजाने २८ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीमुळे चेन्नईने बंगळुरुसमोर विजयासाठी १९२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र बंगळुरुची फलंदाजी अक्षरश: कोलमडून गेली. आघाडीचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही. विराट, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स स्वस्तात बाद झाले. फलंदाजीसोबत रविंद्र जडेजाने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही कमाल दाखवली. त्याने ४ षटकात १३ धावा देत ३ गडी बाद केले. त्यात त्याने एक षटक निर्धाव टाकलं. तसेच क्षेत्ररक्षणात आपली कसब दाखवत डॅन ख्रिश्चनला धावचीत केलं. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने ३ गडी, इम्रान ताहिरनं २ गडी, तर सॅम करन आणि शार्दुल ठाकुरनं प्रत्येकी एक गडी बाद केला.
बंगळुरुचा डाव
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या १९२ धावांचं लक्ष्य गाठताना बंगळुरुची फलंदाजी ढासळली. कर्णधार विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर आणि मॅक्सवेल चांगली कामगिरी करु शकले नाहीत. विराट अवघ्या ८ धावा करून तंबूत परतला. सॅम करनच्या गोलंदाजीवर धोनीने यष्टीमागे त्याचा झेल घेतला. त्यानंतर पडिक्कलही मैदानावर तग धरु शकला नाही. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर सुरेश रैनानं त्याचा झेल घेतला. पडिक्कलने १५ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरही चांगली कामगिरी करु शकला नाही. अवघ्या ७ धावा करून बाद झाला. रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडने त्याचा झेल पकडला. त्यानंतर बंगळुरुच्या अपेक्षा असलेला मॅक्सवेलही स्वस्तात बाद झाला. रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचीत झाला. तर रविंद्र जडेजाने क्षेत्ररक्षणातही कमाल दाखवत डॅन ख्रिश्चनला धावचीत केलं. त्यानंतर लगेचच तिसऱ्या षटकात एबी डिव्हिलियर्सला त्रिफळाचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. त्याने ४ षटकात १३ धावा देत ३ गडी बाद केले.
चेन्नईचा डाव
वानखेडे मैदानावर रविंद्र जडेजाच्या फलंदाजीचं वादळ पाहायला मिळालं. शेवटच्या षटकात त्याने हर्षल पटेलची चांगलीच धुलाई करत ५ षटकार आणि १ चौकार ठोकत ३७ धावा केल्या. फाफ आणि जडेजाच्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नईने १९१ धावा केल्या. जडेजानं २८ चेंडुत ६२ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ षटकार आणि ४ चौकार मारले. यातील ५ षटकार तर त्याने हर्षल पटेलच्या शेवटच्या गोलंदाजीवर ठोकले. त्यामुळे या सामन्यात तीन गडी मिळवूनही हर्षल हतबल झाल्याचं दिसून आलं.
That last over got us like! ONCE MORE Please! #CSKvRCB #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/YYWVvTdaeu
— Chennai Super Kings – Mask Pdu Whistle Pdu! (@ChennaiIPL) April 25, 2021
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आघाडीला फलंदाजीला आलेल्या ऋतुराज-फाफ जोडीनं चेन्नईला आश्वासक सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीनं ७४ धावांची भागिदारी केली. या दोघांच्या खेळीमुळे बंगळुरुच्या गोलंदाजांवर दडपण आलं होतं. मात्र ही जोडी फोडण्यात यजुवेंद्र चहलला यश आलं. त्याच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात ऋतुराज झेलबाद झाला. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर जेमिसननं त्याचा झेल घेतला. ऋतुराजनं ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३३ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनानं फाफला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र १८ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. त्याने खेळीत १ चौकार आणि ३ षटकार ठोकले. मात्र हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडुवर फाफला बाद करण्यातही हर्षलला यश आलं. फाफनं ४१ चेंडूत ५० धावा केल्या. हर्षल पटेलच्या भेदक गोलंदाजीमुळे चेन्नईची धावसंख्या मंदावली. हर्षलनं पुढच्या षटकात अंबाती रायडुला बाद करत सामन्यातील त्याच्या खात्यातील तिसरा गडी टिपला. मात्र या सामन्यातील शेवटच्या षटकात जडेजानं हर्षलच्या गोलंदाजीची चांगलीत धुलाई केली. या सामन्यात हर्षलने ४ षटकात ५१ धावा देत तीन गडी बाद केलेत. हर्षल पटेल पर्पल कपचा मानकरी आहे.
दोन्ही संघातील खेळाडू
चेन्नई संघ- महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायडु, रविंद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चहर, इम्रान ताहीर
बंगळुरुचा संघ- विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, कायल जेमिसन, डॅन ख्रिश्चन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल