शुक्रवारी (२३ एप्रिल) आयपीएलमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सला ९ गड्यांनी सहज मात दिली. नाणेफेक गमावलेल्या मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने केएल राहुल आणि ख्रिस गेल यांच्या योगदानाच्या जोरावर १७.४ षटकातच हे आव्हान गाठले. सामना संपल्यानंतर रोहितने प्रतिक्रिया दिली.
रोहित म्हणाला, ”धावा कमी पडल्या. मला अजूनही असे वाटते, की ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. तुम्ही पंजाबने केलेली फलंदाजी पाहा, त्यांनी ९ गड्यांनी हा सामना जिंकला. हेच तंत्र आमच्या फलंदाजीत नव्हते. जर तुम्ही १५०-१६० धावांचे आव्हान दिले, तर सामना तुमच्या हातात असतो. मागील दोन सामन्यात आम्हाला हे करण्यात अपयश आले. मला वाटते, की पंजाबच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली. ईशानने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला माझ्याप्रमाणे अपयश आले.”
रोहित पुढे म्हणाला, ”मागील काही सामन्यात आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगली फलंदाजी केली, पण आम्ही आज अपयशी ठरलो. आमच्या फलंदाजीच्या फळीत काहीतरी चुकत आहे. आम्ही आम्हाला हव्या त्या पद्धतीने २० षटके खेळू शकत नाही आहोत. आम्हाला असा कोणीतरी हवाय जो फिरकीपटूंविरुद्ध चांगली फलंदाजी करू शकेल आणि सूर्यकुमार ते करू शकत होता. पण, तुम्ही जेव्हा अशा कठीण खेळपट्टीवर खेळता तेव्हा तुम्हाला सर्व शक्यतांचा विचार करावा लागतो. जेव्हा तुम्ही प्रयत्न करता आणि यशस्वी होता, तेव्हा चांगले वाटते आणि चुकता तेव्हा वाईट वाटते. पण आपण आपल्या निर्णयांची पाठराखण केली पाहिजे. आपण मैदानावर पुरेसे प्रयत्न करीत नाही आणि परिस्थिती कठीण असताना आपल्याला फलंदाजी आणि गोलंदाजी कशी करावी लागेल हे समजून घेणे आवश्यक आहे.”
पंजाबविरुद्ध रोहितचे अर्धशतक
पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहितने ५ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात मुंबईचा सलामीवीर क्विंटन डि कॉकने दीपक हुडाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, मोझेस हेन्रिक्सने त्याचा झेल टिपला. कॉकला ३ धावा करता आल्या. त्यानंतर रोहित आणि सूर्यकुमार यादवने अर्धशतकी भागीदारी केली.