या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबने नक्की मनाशी कोणती खुणगाठ बांधली आहे, याचे आश्चर्य साऱ्यांनाच असेल. कारण पंजाबचा संघ अन्य संघांपेक्षा बलाढय़ वाटत नसला तरी त्यांनी पाचही सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पाचव्या लढतीत पंजाबने बंगळुरूवर पाच विकेट्सने सहज विजय मिळवत विजय घोडदौड कायम ठेवली आहे.
बंगळुरूच्या १२५ धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नव्हती, त्यांना तीन फलंदाज ४० धावांमध्ये गमवावे लागले. पण वीरेंद्र सेहवागने दमदार फटकेबाजी करत संघाचा विजय सुकर केला. सेहवागने ४ चौकारांसह ३२ धावांची खेळी साकारली.
तत्पूर्वी, पंजाबने नाणेफेक जिंकत बंगळुरूला फलंदाजीला पाचारण केले आणि संघात ख्रिस गेल (२०) येऊनही त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ४ बाद २६ अशी अवस्था असताना युवराज सिंग फलंदाजीला आला आणि त्याने ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३५ धावांची खेळी साकारत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. पंजाबकडून संदीप शर्माने बंगळुरूच्या पहिल्या तीन फलंदाजांना भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्वस्तात माघारी धाडले आणि बंगळुरूचे कंबरडे मोडले.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत सर्व बाद १२४  (युवराज सिंग ३५, ख्रिस गेल २०; संदीप शर्मा ३/१५, रिषी धवन २/१४) पराभूत वि. किंग्स इलेव्हन पंजाब : १८.५ षटकांत ५ बाद १२७ (वीरेंद्र सेहवाग ३२, डेव्हिड मिलर २६; यजुर्वेद चहल २/२३, वरुण आरोन २/२९).
सामनावीर : संदीप शर्मा.