भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हटला की ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ असतोच. एक वेळ विश्वचषक स्पर्धा जिंकली नाही तरी चालेल पण प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करा असा दोन्ही संघाच्या चाहत्यांचा आवेश असतो. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात ICC च्या स्पर्धा सोडल्या तर इतर वेळी सामने होत नाहीत. पण आधी भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ क्रिकेट मालिका खेळायचे. त्यावेळी अनेकदा खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक रंगायची. तसाच एक किस्सा भारताच्या एका माजी खेळाडूने रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरबद्दल सांगितला.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने पाकिस्तानातील एका सामन्यादरम्यानचा प्रसंग सांगितला. इरफान स्पोर्ट्सतकशी बोलताना म्हणाला, “मी जेव्हा मैदानात फलंदाजी करायला उतरलो, तेव्हा अख्तर खूपच वेगाने गोलंदाजी करत होता. १५०-१६० किलोमीटरच्या ताशी वेगाने तो चेंडू टाकत होता. नॉन-स्ट्राईकवर धोनी उभा होता. मी धोनीला जाऊन विचारलं की खेळपट्टी कशी आहे. धोनी म्हणाला की फार काही खास नाही, तू फलंदाजी करत राहा. अख्तरने मला पहिलाच चेंडू बाऊन्सर टाकला. चेंडू इतका वेगवान होता की चेंडू दिसलाही नाही. आम्ही त्याची स्पेल खेळून काढली आणि मग हळूहळू भागीदारी करायला सुरूवात केली.”

 

“अख्तर सारखा मला डिवचण्याचा प्रयत्न करत होता. तू काहीही करशील तर मी त्याच्या दुप्पट करेन असं तो सारखं सांगत होता. मग मी धोनीला म्हटलं की आता मी पण अख्तरला डिवचणार आहे. तू मला साथ दे आणि अख्तरकडे बघून हसत राहा. धोनी म्हणाला ठीक आहे. त्यानंतर अख्तरचे चेंडू रिव्हर्स स्विंग व्हायला लागले. ते पाहून मी त्याला डिवचायला सुरूवात केली. अख्तर गोलंदाजी करत असताना मी त्याला म्हटलं की बापरे … पुढच्या वेळी पण इतक्याच जोरात गोलंदाजी करावी लागणार आहे. त्यावर धोनी हसला. ते पाहून अख्तर भडकला आणि मला म्हणाला की तू खूप जास्त बोलतो आहेस. तुला इथूनच उचलून घेऊन जाईन”, अशी आठवण इरफानने सांगितली.