भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमधून आपली निवृत्ती जाहीर केली. शनिवारी आपला अखरेचा रणजी सामना खेळत असलेल्या गौतमने आंध्र प्रदेशविरुद्ध शतक झळकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली. नुकतचं गौतम गंभीरने आज तक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. २०१२ साली ऑस्ट्रेलियातील सीबी सिरीजमधले धोनीने कर्णधार म्हणून घेतलेले काही निर्णय हे माझ्यासाठी धक्कादायक होते असं गौतम म्हणाला.

ऑस्ट्रेलियातील मालिकेदरम्यान धोनीने कर्णधार या नात्याने गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या तिन्ही खेळाडूंना एकाच वेळी सामन्यात संधी देता येणार नाही हे स्पष्ट केलं होतं. हे तिन्ही खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षणादरम्यान जास्त धावा देत असल्याचं कारण धोनीने दिलं. मात्र या तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत गौतमला संघात स्थान देण्यात आलं, गौतम आणि सचिन तेंडुलकरने या मालिकेत ७ तर विरेंद्र सेहवागने ५ सामने खेळले. गंभीरने या सामन्यांत ३०८ धावा काढत मालिकेतला दुसरा सर्वाधिक धावा काढण्याचा मानही पटकावला. “२०१५ चा विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार असल्यामुळे मी, विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांना एकत्र संघात स्थान देता येणार नाही हे धोनीने स्पष्ट केलं होतं. त्याचा हा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता. एखाद्या खेळाडूला तुम्ही २०१२ सालात तू २०१५ च्या विश्वचषक संघाचा सदस्य असशील की नाही याची खात्री देता येत नाही, असं सांगितलेलं माझ्या ऐकीवात नाही. जर तुम्ही चांगला खेळ करत गेलात तर तुम्हाला संघात जागा मिळते, तुमचं वय हे खेळाच्या आड येत नाही असंच मला वाटत होतं.” गौतमने धोनीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं.

मात्र हा निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्षात चित्र काहीसं वेगळंच दिसलं. होबार्टमध्ये आम्हाला करो या मरोचा सामना होता तेव्हा मी, सेहवाग आणि सचिन तिघेही संघात खेळलो. ३७ षटकात आम्हाला दिलेलं लक्ष्य पूर्ण करायचं होतं आणि आम्ही ते केलंही. जर तुमच्यात धावा करण्याची क्षमता असेल तर तुम्ही मैदानात कितीही काळ फलंदाजी करु शकता. मात्र पहिल्यांदा तिघांना एकत्र न खेळवण्याबद्दल निर्णय झाल्यानंतर गरजेच्या वेळी आम्ही तिघेही एकत्र खेळलो. जर कर्णधार म्हणून धोनीने एक निर्णय घेतला होता तर त्याच्यावर ठाम राहणं त्याचं काम होतं. त्यामुळे कर्णधार म्हणून धोनीने पहिल्यांदा घेतलेला निर्णय तरी चूकीचा होता किंवा दुसरा निर्णय चुकीचा होता असं चित्र निर्माण होतं. त्याचा हा निर्णय आम्हा तिघांसाठी धक्कादायक असल्याचं गौतमने आज तकशी बोलताना स्पष्ट केलं. या तिरंगी मालिकेत भारताचा संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला, यानंतर यजमान ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम ३ सामन्यांपैकी २ सामने जिंकत मालिका २-१ ने खिशात घातली.