सचिन तेंडुलकरसारख्या महान खेळाडूंना पर्याय नसतो, त्यामुळे त्यांची जागा कोणतेही खेळाडू घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सचिनच्या निवृत्तीनंतर त्याची संघातील जागा कोण घेईल, हे सांगता येत नाही. पण त्याची जागा कोणाला तरी घ्यावी लागेल. त्याचा विचार आम्ही या सामन्यानंतर करू, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.
सचिनबद्दल धोनी म्हणाला की, ‘‘सचिन एक महान खेळाडू आहे. त्याने १९८९ साली जेव्हा कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हापासून आतापर्यंत क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले. या बदलांबरोबर जुळवून घेताना सचिनने आतापर्यंत देदीप्यमान कामगिरी केली आहे. त्याची देहबोली अखेरच्या सामन्याच्या वेळीही पूर्वीसारखीच आहे. त्यामध्ये कोणताच बदल झालेला नाही. त्याचा हा अखेरचा सामना म्हणजे साऱ्यांसाठीच ऐतिहासिक असेल. सचिनबरोबर खेळता येईल, याचा विचार कधीही केला नव्हता. त्याच्याबरोबर घालवलेले क्षण अद्भूत आहेत. अखेरच्या सामन्यात त्याने फक्त खेळाचा आनंद लुटावा, एवढीच अपेक्षा आहे. सचिनबरोबर जिंकलेला विश्वचषक हा माझ्यासाठी सर्वात भावुक आणि हळवा क्षण होता. सचिनसाठी काहीतरी खास करण्यासाठी सारेच प्रयत्नशील आहेत, पण आम्ही साध्या पद्धतीने राहण्याचा विचार केला आहे. कारण सारेच खास करत असताना साधं राहणं खास होऊन जाते.’’
सामन्याविषयी धोनी म्हणाला की, ‘‘आम्ही कसून सराव केला आहे. कारण प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच आम्ही सामन्यावर लक्ष केंद्रित केले आहे. वेस्ट इंडिजचा संघही चांगलाच समतोल असून त्यांचे वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत.’’