पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जायचा. आपल्या गोलंदाजीची विशेष शैली आणि विकेट मिळवल्यानंतर मैदानातलं सेलिब्रेशन यासाठी शोएबची खास ओळख होती. मात्र अनेकदा त्याच्या शैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. २०००-२००१ च्या दरम्यान आयसीसीने शोएबच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेत त्याच्यावर बंदी घालण्याच्या तयारीत होतं. मात्र माजी बीसीसीआय प्रमुख आण तत्कालीन आयसीसी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी मध्यस्थी केल्यामुळे शोएबची कारकिर्द वाचली असा दावा PCB चे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) तौकीर झिया यांनी केला आहे. ते पीटीआयशी बोलत होते.

“जगमोहन त्यावेळी आयसीसी अध्यक्ष होते, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या शब्दाला बराच मान होता. मात्र शोएब अख्तरच्या गोलंदाजी शैलीच्या प्रकरणात दालमियांनी आम्हाला पाठींबा दिला. अनेक आयसीसी सदस्य शोएबच्या विरोधात होते, तरीही दालमिया आपल्या मतावर ठाम राहिले. यानंतर आयसीसीने शोएबच्या गोलंदाजी शैलीला मान्यता देऊन त्याला खेळण्याची परवानगी दिली.” पीटीआयशी बोलत असताना झिया यांनी शोएबच्या शैलीबद्दल एक आठवण सांगितली.

काही दिवसांपूर्वी शोएब अख्तरने करोनाविरुद्झ लढ्यात निधी उभा करण्यसाठी भारत-पाक क्रिकेट मालिका खेळवण्याचा पर्याय सूचवला होता. काही माजी पाक क्रिकेटपटूंनी याला चांगला प्रतिसादही दिला…पण भारताने पाकिस्तानसोबत सध्याच्या परिस्थितीत क्रिकेट खेळणं शक्य नसल्याचं सांगत ही कल्पना धुडकावून लावली होती. भारताविरुद्ध क्रिकेट मालिका खेळवली गेली नसल्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फटका बसल्याचंही समोर आलं आहे.

अवश्य वाचा – भारताविरुद्ध क्रिकेट मालिका रद्द, पाक क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फटका