भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

भारताचा कर्णधार विराट कोहलीविषयी मला प्रचंड आदर आहे. परंतु एकमेकांविरुद्ध खेळताना त्याला डिवचण्यात आम्हा सर्वानाच मजा येते, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने व्यक्त केली.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रदीर्घ दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामने खेळण्याबरोबरच चार कसोटी लढतीही खेळवल्या जाणार आहेत. मात्र अ‍ॅडलेड येथे होणारी प्रकाशझोतातील पहिली कसोटी संपल्यानंतर कोहली मायदेशी परतणार आहे. कोहली आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म जानेवारीच्या पूर्वार्धात अपेक्षित असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) त्याला पितृत्वाची रजा मंजूर करण्यात आली आहे.

कोहलीच्या निर्णयाबाबत एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पेन म्हणाला, ‘‘कोहलीच्या निर्णयाचा सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आदर आहे. मात्र त्याच्या अनुपस्थितीत मालिकेतील मजा काहीशी कमी होईल. कोहली हा माझ्यासाठी एका सामान्य फलंदाजाप्रमाणेच आहे. माझे त्याच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नाही. त्याची फलंदाजी पाहताना नेहमीच मजा येते. मात्र त्याने आमच्याविरुद्ध धावा करू नये, असेही वाटते. त्यामुळे मैदानावर असताना त्याला डिवचण्यात वेगळाच आनंद मिळतो. यामुळे लक्ष विचलित होऊन तो चुकीचा फटका खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही.’’

२०१८मध्ये उभय संघांत झालेल्या कसोटी मालिके दरम्यान कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने २-१ असा विजय साकारला होता. मात्र या वेळी भारताला त्याची पुनरावृत्ती करता येणार नाही, असा विश्वासही पेनला आहे.

कोहली क्रीडाजगतातील सामर्थ्यवान खेळाडू – टेलर

मेलबर्न : विराट कोहली हा क्रीडाविश्वातील सर्वाधिक सामर्थ्यवान खेळाडू आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी व्यक्त केले. ‘‘कोहलीला आक्रमकता आणि परिपक्वता यांच्यातील फरक माहीत आहे. फारच कमी खेळाडूंना आक्रमक शैलीबरोबरच परिस्थितीनुसार खेळ करून संघाला विजयी करता येते. कोहली हा त्यांच्यापैकीच एक असल्याने त्याला रोखणेच ऑस्ट्रेलियापुढील प्रमुख आव्हान असेल,’’ असे टेलर म्हणाले. त्याशिवाय जो बर्न्‍सच्या जागी ऑस्ट्रेलियाने अनुभवी डेव्हिड वॉर्नरच्या साथीने युवा विल पुकोवस्कीला सलामीला पाठवावे, असेही ५६ वर्षीय टेलर यांनी सुचवले.