ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जस्टिन लॅंगरची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौ-यातील बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे मुख्य प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी राजीनामा दिला होता, तेव्हापासून हे पद रिक्त होतं. त्यानंतर प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अनेक नावांची चर्चा होती, अखेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) जस्टिन लॅंगरच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये लॅंगर ऑस्ट्रेलिया संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल.

प्रशिक्षकपदाचा चांगला अनुभव लॅंगरकडे आहे. बिग बॅश स्पर्धेत लॅंगरने पर्थ स्कॉचर्स या संघाचं प्रशिक्षकपद सांभाळलं आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये लॅंगर पर्थ स्कॉचर्स संघाचा प्रशिक्षक होता, या दरम्यान त्याच्या संघाने तीन वेळेस स्पर्धा जिंकली होती. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघाचा सह-प्रशिक्षक म्हणूनही त्याने काही काळासाठी काम पाहिलं आहे.

लॅंगरने ऑस्ट्रेलियाकडून १०५ कसोटी सामने खेळले असून, यामध्ये २३ शतकांच्या सहाय्याने त्याने ७ हजार ६९६ धावा ठोकल्या आहेत.