News Flash

महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या विकासासाठी सांगलीत प्रगत कबड्डी प्रशिक्षण शिबीर

शिबिरात सहभागी झालेल्या २७ खेळाडूंना कबड्डीतील कौशल्यासोबत अन्य काही गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात सहभागी झालेल्या २७ खेळाडूंना कबड्डीतील कौशल्यासोबत अन्य काही गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात आले.

राजू भावसार फाउंडेशनतर्फे महाराष्ट्राच्या खेळाडूंचे व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी आठवडय़ाभराचे प्रगत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. सांगली येथील शांती निकेतन विद्यापीठाच्या क्रीडांगणावर झालेल्या या शिबिरात रिशांक देवाडिगा, विशाल माने, महेंद्र रजपूत, बाजीराव होडगे, नितीन मदने, तुषार पाटील, संकेत चव्हाण, कृष्णा मदने, रवींद्र कुमावत या प्रो कबड्डी लीगमधील आघाडीच्या कबड्डीपटूंसह काही उदयोन्मुख खेळाडूंनाही विशेष आमंत्रित करण्यात आले होते.

या शिबिरात सहभागी झालेल्या २७ खेळाडूंना कबड्डीतील कौशल्यासोबत अन्य काही गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या सत्रात शारीरिक तंदुरुस्ती, दुसऱ्या सत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तिसऱ्या सत्रात कबड्डीच्या कौशल्याचा सराव यात समाविष्ट होता.

पहिल्या दिवशी आहारतज्ज्ञ डायना पिंटो यांनी कबड्डी खेळाडूंनी कोणता आहार घ्यावा यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी खेळाडूंना कसे प्रेरित (मोटिव्हेट) करावे, याचे बहुमोल मार्गदर्शन किशोर बारस्कर यांनी केले. खेळ कोणताही असो त्यात एकाग्रता ही लागतेच. ही एकाग्रता मिळविण्यासाठी कोणत्या प्रकारची योगासने करावीत, हे योगाचार्य बाळकृष्ण चिटणीस यांनी खेळाडूंना प्रात्याक्षिकासह करून दाखवले. खेळताना होणारी दुखापत कशी टाळावी, तसेच ती झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, याची माहिती सोप्या पद्धतीने डॉ. संदीप कुरळे यांनी करून दिली. डॉ. कुरळे हे मुंबई सिटी फुटबॉल संघाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी आहेत. जे खेळाडू उत्तेजक द्रव्य घेऊन खेळतात त्यांना त्यांनी सावधतेचा इशारा दिला. त्या द्रव्याचे त्यानंतर त्या व्यक्तीवर होणारे वाईट परिणाम हेदेखील त्यांनी खेळाडूंना समजावून दिले. बंगाल वॉरियर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप तरकस यांनीदेखील या शिबिराला भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधताना संघमालकांच्या खेळाडूंकडून असलेल्या अपेक्षा विशद केल्या. त्याचबरोबर खेळाडूंच्या संघमालकांकडून काय अपेक्षा आहेत, या जाणून घेतल्या.

प्रत्येक खेळाडूवर वैयक्तिक लक्ष देता येऊ शकेल, या एकमेव हेतूने या शिबिरातील खेळाडूंच्या संख्येवर मर्यादा ठेवण्यात आली. या शिबिराच्या शेवटी एका एका खेळाडूला बाजूला घेऊन त्यांना आपला खेळ उंचावण्यासाठी काय काय सुधारणा करायला हव्यात, याचे मार्गदर्शन सर्व प्रशिक्षकांनी एकत्रित येऊन केले. तसेच या मार्गदर्शनातून त्यांनी काय प्रगती केली, याचा आढावा घेण्यात येणार आहे. या शिबिरात शांताराम जाधव, श्रीराम (राजू) भावसार, माणिक भोगाडे, सीताराम साळुंखे, तारक राऊळ, राष्ट्रीय खेळाडू प्रकाश साळुंखे, जयवंत बोडके, तंदुरुस्तीतज्ज्ञ स्वप्निल हजारे, संग्राम मांजरेकर, महेश शिंदे अशा दिग्गजांनी खेळाडूंना बहुमोल मार्गदर्शन केले.या शिबिराचे उद्घाटन शांती निकेतनचे गौतम पाटील, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त संजय भोकरे यांच्या उपस्थितीत पार पडला, तर समारोप महाराष्ट्राचे क्रीडा सचिव दिलीप सोपल व गौतम पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 2:04 am

Web Title: kabaddi training camp in sangli for the development of maharashtra players
Next Stories
1 आशियाई बॉक्सिंग  स्पर्धा : विकास, गौरव उपांत्यपूर्व फेरीत
2 सौम्यजीत घोषला दुहेरी मुकुट
3 चेसच्या नाबाद शतकामुळे विंडीजचा डाव सावरला
Just Now!
X