News Flash

महाराष्ट्राची घोडदौड कायम

महाराष्ट्राने रविवारीदेखील चांगल्या कामगिरीसह अव्वल स्थानावर राहण्याचे सातत्य कायम राखले आहे.

महाराष्ट्राने रविवारीदेखील चांगल्या कामगिरीसह अव्वल स्थानावर राहण्याचे सातत्य कायम राखले आहे. महाराष्ट्राने जिम्नॅस्टिकमध्ये तब्बल चार सुवर्ण पदकांसह वेटलिफ्टिंगमध्ये दोन, नेमबाजीत एका पदकाची कमाई केली. त्याशिवाय खो-खोमध्ये देखील महाराष्ट्राच्या मुलांनी दोन्ही गटात विजयी सलामी देत दमदार कामगिरीची आशा निर्माण केली.

जिम्नॅस्टिकमध्ये चार सुवर्ण

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्समधील वर्चस्व कायम राखताना रविवारी चार सुवर्णपदकांची कमाई केली. आदिती दांडेकरने दोन प्रकारांत तर रिचा चोरडिया व अरिक डे यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवित महाराष्ट्राच्या यशात महत्त्वाचा वाटा उचलला. जिम्नॅस्टिक्सच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने चार रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई  केली. मुलींच्या २१ वषार्खालील क्लब्ज प्रकारात रिचा हिने ११.६५ गुण नोंदवित सुवर्णपदक जिंकले. सहकारी आदिती दांडेकर हिने १०.७५ गुणांसह रौप्यपदक मिळविले तर दिल्लीच्या मेहकप्रीत कौर हिने १० गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. आदिती हिने रिबन्स प्रकारात सोनेरी कामगिरी करताना १२.१५ गुणांची नोंद केली.  आदिती हिने चेंडू प्रकारातही सुवर्णपदकांची नोंद केली तिने १२.६५ गुण नोंदविले. जी.मेघना रेड्डी (त्रिपुरा) व किमया कदम (महाराष्ट्र) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. आदिती हिला हूप प्रकारात रौप्यपदक मिळाले. तिने १०.४५ गुण मिळविले. मेघना रेड्डी हिने ११.०५ गुणांसह सुवर्णपदक पटकाविले. हॉरिझोन्टल बार या प्रकारात अरिक याने सुवर्णपदक जिंकताना १२.२५ गुण नोंदविले. त्याचा सहकारी ओंकार शिंदे याने ११.४० गुणांसह रौप्यपदक मिळवले.

अवंतिका नराळेची सोनेरी धाव

कबड्डीमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवलेल्या अवंतिका नराळेने हा निर्णय बदलून अ‍ॅथलेटिक्सची वाट निवडली. हा निर्णय सार्थ ठरवत तिने येथे १७ वर्षांखालील गटात २०० मीटर्स धावण्याची शर्यत जिंकली. महाराष्ट्राच्या दिनेश सिंगने २१ वर्षांखालील गटाच्या १० हजार मीटर्स धावण्याच्या शर्यत जिंकून नेत्रदीपक कामगिरी केली. अक्षय गोवर्धन याने मुलांच्या दोनशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले.अवंतिका हिने २०० मीटर्सचे अंतर २४.४७ सेकंदात पार केले. तेलंगणाची जीवनजी दीप्ती (२५.२६ सेकंद) व उत्तरप्रदेशच्या प्रियंका सिकरवार (२५.४८ सेकंद) यांना रौप्य व कांस्यपदक मिळाले.

वेटलिफ्टिंगमध्ये दोन पदके

वेटलिफ्टिंगमधील महाराष्ट्राच्या मयुरी देवरेने २१ वर्षांखालील मुलींमध्ये कांस्यपदक मिळवले. तिने ७६ किलो गटात स्नॅचमध्ये ७९ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ९७ किलो असे एकूण १७६ किलो वजन उचलले. या गटात तामिळनाडूच्या अलीषा आरोकिया हिने सुवर्णपदक पटकावले. तिने स्नॅचमध्ये ८५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १०८ किलो असे एकूण १९३ किलो वजन उचलले. मणीपूरच्या ए.तुमीना देवीने रौप्यपदक मिळवताना स्नॅचमध्ये ७७ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १०० किलो असे एकूण १७७ किलो वजन उचलले. महाराष्ट्राच्या श्रेया गुणमुखी हिने १७ वर्षांखालील ७६ किलो  गटात रौप्यपदक पटकाविले. तिने स्नॅचमध्ये ६६ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ८१ किलो असे एकूण १४७ किलो वजन उचलले. हरयाणाच्या तमन्नाकुमारी हिने सुवर्णपदक जिंकताना स्नॅचमध्ये ७५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ८१ किलो असे एकूण १७२ किलो वजन उचलले. आंध्रप्रदेशच्या सी.एस.लक्ष्मी हिने कांस्यपदक जिंकले.

नेमबाजीत अभिज्ञाला कांस्य

महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटीलने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात २५ मीटर पिस्तुल प्रकारात कास्यंपदक मिळविले. अभिज्ञाने २० गुण नोंदविले. अभिज्ञाला कास्यंपदक मिळालेल्या गटात दिल्लीची देवांशी राणा (२४ गुण) व हरयाणाची अंजली चौधरी (२३ गुण) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळविले. राजस्थानच्या दिव्यांश सिंह पन्वर व मानिनी कौशिक यांना रौप्यपदक मिळाले. त्यांनी ४९६.१ गुण मिळविले. मध्यप्रदेशच्या श्रेया अगरवाल व हर्षित बिंजवा यांनी ४३३.६ गुणांसह कांस्यपदक पटकाविले.

१० वर्षांचा नेमबाज सुवर्णविजेता

पष्टिद्धr(१५५)म बंगालच्या मेहुली घोष या आंतरराष्ट्रीय खेळाडूने दहा वर्षीय खेळाडू अभिनव शॉ याच्या साथीत दहा मीटर्स एअर रायफल मिश्रदुहेरी विभागात सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी ५०१.७ गुणांची नोंद केली. १० वर्षांच्या खेळाडूने सुवर्णपदक मिळवण्याची कामगिरी प्रथमच केली असल्याने अभिनवच्या कामगिरीला सर्वच स्तरावरुन दाद मिळाली.

बॅडमिंटनमध्ये दुहेरी यश

पुणे : बॅडमिंटनमध्ये रविवारी महाराष्ट्राला संमिश्र यश लाभले. १७ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या आर्या देशपांडे व अनन्या फडके यांनी अजिंक्यपद मिळवताना राजस्थानच्या साक्षी असरानी व अनुष्का मेहता यांचा  दोन गेम्समध्ये पराभव केला. हा सामना त्यांनी २१-१६, २१-१३ असा जिंकला.मुलांच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राकडून अमन फारुख संजयने अजिंक्यपद पटकावले.  मुलींमध्ये मालविका अडसूळला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

खो-खोमध्ये विजयी सलामी

महाराष्ट्राने मुलांच्या १७ व २१ वषार्खालील गटात दणदणीत विजय मिळवित खो खो मध्ये झोकात विजयी सलामी केली.  महाराष्ट्राने १७ वर्षांखालील मुलांच्या एकतर्फी लढतीत गुजरातला  ११-९ असे दोन गुण व साडेसात मिनिटे राखून पराभव केला. त्याचे श्रेय दिलीप खांडवी (२ मि.१० सेकंद व १ मिनिट ४० सेकंद), रोहन कोरे (२ मि, २ मि.२० सेकंद तसेच तीन गडी), अभिषेक शिंदे (नाबाद दीड मिनिटे व एक मिनिट ४० सेकंद) यांना द्यावे लागेल. गुजरातकडून किस्मत दाबीने चार गडी बाद करीत एकाकी लढत दिली. तामिळनाडू संघाने मणिपूर संघाचा १४-११ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला. त्यामध्ये एम.गोपालकृष्ण (२ मि.५० सेकंद, १ मि.४० सेकंद व ५ गडी), टी. गौतम (नाबाद अडीच मिनिटे, दीड मिनिटे व चार गडी) यांनी महत्त्वाचा वाटा उचलला.  मुलांच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने छत्तीसगढ संघाचा २०-१२ असा एक डाव ८ गुणांनी धुव्वा उडविला.अवधूत पाटील (१ मि. १० सेकंद व १ मि. ४० सेकंद, तसेच चार गडी), मिलिंद कुरपे (२ मिनिटे व चार गडी), अरुण गुणके (२ मि. २० सेकंद व तीन गडी) यांनी अष्टपैलू कामगिरी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 1:09 am

Web Title: khelo india youth games 2019
Next Stories
1 अव्वल पाचमधील स्थान गाठण्याचे ध्येय!
2 क्रिकेट खेळतानाच ह्रदयविकाराचा झटका, माजी रणजीपटूचा दुर्दैवी मृत्यू
3 IPL 2019 : पॅडी अपटन राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदी
Just Now!
X