मिलिंद चवरेकर, खो-खो पटू
आतापर्यंत मला जीवनात जी काही प्रसिद्धी व पैसा मिळाला आहे, त्याचे श्रेय खो-खो खेळास द्यावे लागेल. या खेळाच्याच ऋणात नेहमी राहणे मला आवडेल, असे ‘एकलव्य’ विजेता महाराष्ट्राचा खो-खो पटू मिलिंद चवरेकर याने सांगितले.
सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने पुरुष व महिला या दोन्ही विभागात अजिंक्यपद मिळविले. पुरुषांमध्ये त्यांनी रेल्वेची विजेतेपदाची मक्तेदारी मोडून काढीत हे यश पटकाविले. या विजेतेपदात चवरेकर याने केलेल्या सातत्यपूर्ण व अष्टपैलू खेळाचा मोठा वाटा होता. चवरेकर याने या विजेतेपद व आजपर्यंतच्या कामगिरीबाबत ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीबरोबर मनमोकळेपणाने गप्पागोष्टी केल्या.
* विजेतेपद मिळविण्याचा आत्मविश्वास होता काय ?
विजेतेपद मिळविण्याची यंदा आम्हाला खात्री होती. आपल्याला हे यश मिळविण्यासाठी कोणते संघ आव्हानात्मक आहेत याचा आम्ही बारकाईने अभ्यास केला होता. तसेच या स्पर्धेसाठी पुण्यात नवमहाराष्ट्र संघाची अखिल भारतीय स्पर्धा सुरू असतानाच उरलेल्या वेळेत आमच्या संघाचा सराव होत असे. या स्पर्धेमुळे आम्हाला आणखीनच स्पर्धात्मक सराव करण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा आम्हाला सोलापूर येथील स्पर्धेच्या वेळी झाला. तेथील प्रत्येक सामन्याकरिता आम्ही वेगवेगळे नियोजन करीत होतो. उपांत्य फेरीत कोल्हापूरविरुद्ध सहज विजय मिळविल्यानंतर विजेतेपद आपलेच आहे असा आत्मविश्वास निर्माण झाला.
* अंतिम लढतीविषयी काय नियोजन केले होते ?
रेल्वेचे खेळाडू कोणत्या शैलीने संरक्षण करतात, ते गडी कसे टिपतात, त्यांची मुख्य मदार कोणत्या खेळाडूंवर आहे याचेही आम्ही निरीक्षण केले होते. आमचे प्रशिक्षक एजाज शेख यांनी त्यादृष्टीने नियोजन केले व आम्हाला अनुकूल होईल अशी व्यूहरचनाही केली. या सामन्यात आमच्यावर कोणतेही दडपण नव्हते. पूर्वार्धात आम्ही दोन गुणांची आघाडी घेतली, तीच आघाडी आमच्यासाठी निर्णायक ठरली.
ल्ल या खेळातील आजपर्यंतच्या यशाचे श्रेय तू कोणाला देशील ?
माझे आईवडील तसेच मला या खेळाचे प्रशिक्षण देणारे आमच्या हिंदकेसरी संघाचे मार्गदर्शक सुधाकर माने व मिलिंद सावर्डेकर यांना मी या यशाचे श्रेय देईन. महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचाही माझ्या पुरस्कारात वाटा आहे. या सर्वामुळेच मी जीवनात चांगले स्थान मिळवू शकलो आहे.
* पुरस्कारानंतर तुझ्या गावातील वातावरण कसे होते ?
आमच्या कवठेपिरान गावात माझे भव्य स्वागत झाले. अनेक ठिकाणी माझ्या स्वागताची पोस्टर्स लावली होती. एखादा शूरवीर लढाई जिंकून मायभूमीत परत येतो तेव्हा त्याचे जसे स्वागत केले जाते, तसे स्वागत मिळण्याचे मला भाग्य लाभले. एकलव्य पुरस्कार हा केवळ माझ्यासाठी नव्हे तर आमच्या गावाचाच हा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे आमच्या गावातील अनेक शालेय खेळाडूंना या खेळासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. नजीकच्या काळात मला रेल्वे खात्यात नोकरी मिळणार आहे.
ल्ल खो-खो खेळाची प्रो स्पर्धा आयोजित करावी असे तुला वाटते काय ?
होय. अशा लीगमुळे या खेळाची लोकप्रियता वाढण्यास मदत होईल. या खेळात करिअर करू इच्छिणारे किंवा करिअर करणारे बरेचसे खेळाडू आर्थिकदृष्टय़ा बेताचीच परिस्थिती असलेल्या घरांतून आलेले असतात. त्यांना या लीगमुळे आर्थिक फायदा होणार आहे. तसेच स्पर्धात्मक अनुभवामुळे खेळाचा दर्जाही उंचावण्यास मदत होईल. हा खेळ घराघरात पोहोचविण्यासाठी प्रो लीग स्पर्धा अनिवार्य आहेत.
* नजीकचे ध्येय काय आहे ?
एकलव्य पुरस्कार मिळाला तरी मी समाधानी राहणार नाही. अजून मला महाराष्ट्रास भरपूर यश मिळवून द्यायचे आहे. खेळण्याबरोबरच नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचीही माझी इच्छा आहे. हा खेळ अनेक खेळांचा आत्मा आहे, हे मी अधिकाधिक मुलामुलींना पटवून देण्यासाठी, तसेच या खेळात करिअर करण्यासाठी किती उत्तम संधी आहे हे त्यांना समजावून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Nov 2015 रोजी प्रकाशित
आठवडय़ाची मुलाखत : खो-खो खेळानेच मला घडविले
आतापर्यंत मला जीवनात जी काही प्रसिद्धी व पैसा मिळाला आहे, त्याचे श्रेय खो-खो खेळास द्यावे लागेल.
Written by झियाऊद्दीन सय्यद

First published on: 30-11-2015 at 02:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kho kho player milind chavrekar interview for loksatta