एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व भावते, म्हणून ती त्याच्या प्रेमात पडते आणि चक्क त्या व्यक्तीला लग्नाची मागणीही घालते.. तुम्हाला हे सारे एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटेल. पण ही सत्य घटना आहे, तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या क्रिकेटपटू विराट कोहलीबाबत. क्रिकेटपटू आणि बॉलीवूडमधल्या व्यक्तींना प्रसिद्धीच्या वलयात राहायला नेहमीच आवडते आणि लोकांना हवा असलेल्या मसाला बातम्यांची रसद ते पुरवत असतात. मैदान गाजवणारे क्रिकेटपटू प्रीतीच्या खेळपट्टीवर बेमालूमपणे उतरतात, रंगतात आणि त्यांच्या नावाची चर्चा सुरू होते. सध्याचा भारताचा सर्वात फॉर्मात असलेला कोहली आणि बॉलीवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा सुरू असतानाच विराटला चक्क लग्नाची मागणी घातली आहे ती इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल व्ॉटने. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील लढत पाहून डॅनियल विराटच्या प्रेमातच पडली, पण एवढय़ावर ती थांबली नाही तर तिने ‘ट्विटर’च्या माध्यमातून विराटला ‘कोहली, मॅरी मी’ अशी चक्क लग्नासाठी विचारणा केली आहे. विराट आणि अनुष्का यांनी आपण फक्त चांगले मित्र असल्याचे सांगत आपल्या प्रेमसंबंधांविषयी नकार दिला होता. पण आता डॅनियलने यामध्ये उडी घेत या पटकथेला त्रिकोणी वळण दिले आहे.
डॅनियलने भारताविरुद्ध ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय क्रिकटमध्ये पदार्पण केले असून तिने नुकतेच २३व्या वर्षांत पदार्पण केले आहे. विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यानंतर डॅनियल ही कोहलीच्या प्रेमात पडली आणि त्याला लग्नाची मागणीही घातली. याविषयी विचारले असता डॅनियलने कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही, आता यावर कोहलीकडून काय उत्तर येते, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.