भारताचा युवा बॅडमिंटनपटू कदम्बी श्रीकांत याला ‘स्विस’ अभियानाची यशस्वी सुरुवात करता आली नाही. पाचव्या मानांकित श्रीकांतला स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सलामीच्या सामन्यात स्वीडनच्या हेन्री हर्सकायनेन याच्याकडून पराभूत व्हावे लागले.
पहिला गेम सहज जिंकून श्रीकांतने विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र त्याला हर्सकायनेन याच्याकडून २१-१९, १८-२१, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला.
पहिल्या गेममध्ये सुरेख सुरुवात करत श्रीकांतने १०-७ अशी आघाडी घेतली. १३-१३ अशा बरोबरीनंतर त्याने सलग चार गुण मिळवत आगेकूच केली. हर्सकायनेनने कडवा प्रतिकार करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण श्रीकांतने हा गेम जिंकत सामन्यात १-० अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या गेममध्येही ४-२ अशी सरशी साधत त्याने विजयाच्या दिशेने कूच केली. मात्र हर्सकायनेनने सलग पाच गुण मिळवून ७-४ अशी आघाडी घेतली. १४-१४ अशा बरोबरीनंतर हर्सकायनेन याने आपला खेळ उंचावत दुसरा गेम जिंकला.
अटीतटीच्या रंगलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये श्रीकांतने अखेपर्यंत कडवी झुंज दिली. ९-५ अशा पिछाडीनंतर त्याने १०-१० अशी बरोबरी साधली. मात्र त्यानंतर हर्सकायनेनने सुरेख फटके लगावत १७-१३ अशी आघाडी घेतली. १८-१७ अशा स्थितीनंतर हर्सकायनेनने सलग तीन गुण मिळवल्यामुळे श्रीकांतला हा सामना गमवावा लागला.