आज आयपीएल 2021मध्ये पहिला डबल हेडर सामना खेळवण्यात येत आहे. चेन्नईत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगत आहे. या सामन्यात आरसीबीचा फलंदाज विराट कोहली धावा जमवण्यात अपयशी ठरला. त्याला 6 चेंडूत फक्त 5 धावा करता आल्या. कोलकाताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याला झेलबाद केले.

सामन्याच्या दुसऱ्याच षटकात विराट बाद झाला. वरुण टाकत असलेल्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विराटने ऑफ साईडला एक उंच फटका खेळला. तिथे तैनात असलेला कोलकाताचा क्षेत्ररक्षक राहुल त्रिपाठीने मागे धावत जाऊन हा झेल टिपला. राहुलने घेतलेला हा झेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 

आयपीएल 2021मधील हा दहावा सामना चेन्नईच्या एमए चिदम्बरम मैदानात सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत विराटच्या बंगळुरु संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आता गुणतालिकेत अव्वल राहण्यासाठी विराटसेनेची धडपड सुरू झाली आहे. कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून पुन्हा अव्वल येण्याचा विराटसेनेचा मानस आहे.

विराटसेनेने आतापर्यंत दोन सामने खेळले असून यात त्यांना विजय मिळाले आहेत. कोलकाताला एका सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. त्यामुळे कोलकाताला पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा मॉर्गनचा मानस आहे.