कोल्हापूर म्हणजे कुस्तीचे माहेरघर, पण याच माहेरघरातून वीरधवल खाडेसारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरणपटू भारताला मिळाला आणि त्याचाच कित्ता गिरवत कोल्हापूरच्या जलतरणपटूंनी चिवला समुद्र किनाऱ्यावर आयोजित केलेल्या चौथ्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत बाजी मारली. कोल्हापूरच्या निकिता प्रभूने यावेळी मुलींच्या गटामध्ये सर्वोत्तम जलतरणपटू होण्याचा मान पटकावला आणि तिच्यासह पाच अव्वल क्रमांक पटकावत कोल्हापूरने या स्पर्धेत बाजी मारली.
महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना आणि सिंधुदुर्ग जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिमाखदार राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन मालवणच्या चिवला समुद्र किनाऱ्यावर करण्यात आले होते.
सागरी किनारा लाभलेल्या मुंबई किंवा कोकणातील स्पर्धक या स्पर्धेत बाजी मारतील, असे काही जणांचे ठोकताळे होते. पण समुद्रकिनारा नसला तरी आम्ही कुठेच कमी नाही, हे कोल्हापूरच्या जलतरणपटूंनी दाखवून दिले.

स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे –
सर्वोत्तम जलद जलतरणपटू – मुले : स्वेजल मानकर (पुणे), मुली : निकिता प्रभू (कोल्हापूर).
५०० मी. मुलगे : आर्य देसाई (रायगड), मुली : अनुष्का धात्रा (नाशिक).  
८-१० वर्षे (मुले) : काशिनाथ गावडे (सिंधुदुर्ग), मुली  : सतविजी पवार (नाशिक).  
११-१२ वर्षे : (मुले) उत्कर्ष हेडगे (ठाणे), मुली : हेमांगी फडके (नागपूर).
४५-७० वर्षे : पुरुष : भोजराज मेश्राम (कोल्हापूर), महिला : पुष्पा भट (मुंबई).
१३-१५ वर्षे मुलगे : अनिकेत सावंत (कोल्हापूर), मुली : सिद्धी कोतवाल (नाशिक).
१६-१८ वर्षे मुलगे : स्वेजल मानकर (पुणे), मुली : निकिता प्रभू (कोल्हापूर).
१९-२५ वर्षे : प्रसाद खैरनार (नाशिक).
२८-३५ वर्षे : गिरीश मुळीक (पुणे).
अपंग गट – पुरुष : स्वप्निल पाटील (कोल्हापूर), महिला : ऋग्वेदा दळवी (कोल्हापूर).

याआधीचा सागरी जलतरणाचा  अनुभव मला यावेळी कामी आला. कोल्हापूरमध्ये जलतरणाला सुगीचे दिवस आले आहेत, त्यामागे प्रशिक्षकांची मेहनत आहे. आता मला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळायचे आहे.
निकिता प्रभू

वयाला कसलेच बंधन नसते, त्यामुळे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्ही इथे आलो. इथले पाणी अन्य समुद्र किनाऱ्यांपेक्षा नक्कीच स्वच्छ असल्याने पोहायला मजा आली. स्पर्धा पूर्ण केल्याचा आनंद शब्दांत वर्णन करता येणार नाही.
नसीम फाईदानी

मी पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलो आहे, पण यापूर्वी बऱ्याच जलतरण स्पर्धामध्ये मी भाग घेतला आहे. त्यामुळे या स्पर्धेविषयी मनात भीती नाही. आमचा उत्साह वाढवण्यासाठी सर्वच जण आपल्या परीने प्रयत्न करत आहे. अथक सरावानंतर ही स्पर्धा पूर्ण केल्याचा नक्कीच आनंद आहे.
प्रतीक गुप्ता

या स्पर्धेच्या निमित्ताने बरेच काही मला शिकता आले. या स्पर्धेची जोरदार तयारी आम्ही केली होती. स्पर्धेत सर्वोत्तम आल्याचा आनंद नक्कीच आहे, पण पुढील स्तरावर जाण्यासाठी मी उत्सुक आहे.
– स्वेजल मानकर