भारताच्या पारुपल्ली कश्यपची कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील दिमाखदार घोडदौड शनिवारी जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या केन्टो मोमोटाने उपांत्य सामन्यात रोखली.

जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर विराजमान असणाऱ्या कश्यपचे एकमेव आव्हान भारताकडून स्पर्धेत उरले होते; परंतु ४० मिनिटांच्या सामन्यात दोन वेळा विश्वविजेत्या मोमोटाने कश्यपला २१-१३, २१-१५ असे नामोहरम केले.

२०१४ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या कश्यपचा याआधी चार वर्षांपूर्वी इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत मोमोटाशी सामना झाला होता. शनिवारच्या सामन्याआधी कश्यपने मोमोटाविरुद्ध झालेले दोन्ही सामने गमावले होते. चालू वर्षी हैदराबादच्या ३३ वर्षीय कश्यपने कॅनडा खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

मोमोटाने सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण मिळवताना ९-५ अशी आघाडी घेतली. फसवे परतीचे फटके आणि शरीरवेधी स्मॅश या बळावर कश्यपने सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला; परंतु पहिल्या गेममधील विश्रांतीप्रसंगी मोमोटाकडे चार गुणांची आघाडी होती. त्यानंतर मात्र कश्यपचा मोमोटाच्या आक्रमणापुढे निभाव लागला नाही आणि तो १०-१८ असा पिछाडीवर पडला. मग मात्र मोमोटाने पहिला गेम आरामात जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये डावखुऱ्या मोमोटाने नवी रणनीती वापरल्याने रॅलीचा वेग वाढला. त्यामुळे मोमोटाकडे ७-२ अशी आघाडी होती. मग कश्यपने सलग पाच गुण मिळवत मोमोटावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला; परंतु तरीही मोमोटाने विश्रांतीला ११-७ अशी आघाडी टिकवण्यात यश मिळवले. कश्यपने पुन्हा भेदक स्मॅशेसच्या बळावर आघाडीमधील तफावत ११-१२ अशी कमी केली. मग नेटजवळून सुरेख फटक्याच्या बळावर कश्यपने बरोबरी साधली; पण मोमोटाने सहा गुणांची कमाई करीत १९-१३ अशी वर्चस्वपूर्ण आघाडी मिळवली आणि नंतर गेमसह सामनाही जिंकला.