दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानावर अखेरचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ऐच्छिक सरावसत्रात सहभागी होण्याऐवजी विश्रांती घेणं पसंत केलं. मात्र फिरकीपटू कुलदीप यादव यावेळी गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव करताना नेट्समध्ये दिसला. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अवश्य वाचा – जुन्या विंडीज संघाप्रमाणे भारतीय गोलंदाजांचा मारा, ब्रायन लाराकडून कौतुकाची थाप

पहिल्या दोन कसोटी सामन्यात कुलदीप यादवला संधी मिळाली नव्हती. मात्र गुरुवारी झालेल्या सरावसत्रात कुलदीपने अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यासोबत फलंदाजीचा सराव केला. यादरम्यान कुलदीपने काही चांगले फटकेही खेळले. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी रांचीच्या खेळपट्टीची पाहणी केली, प्राथमिक अंदाजानुसार फिरकीपटूंना या खेळपट्टीवर चांगली मदत मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु-प्लेसिसनेही याबद्दलही सकारात्मकता दर्शवली आहे.

रांचीची खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी असल्यामुळे रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन आश्विन यांची संघातली निवड निश्चीत मानली जात आहे. त्यामुळे कुलदीप यादवला संघात जागा द्यायची असल्यास कोणत्या जलदगती गोलंदाजाला संघाबाहेर जावं लागेल याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यात आश्विन-जाडेजाच्या फिरकी जोडगोळीने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे अंतिम कसोटी सामन्यात कोणत्या खेळाडूला संघात जागा मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : रांची कसोटीत महेंद्रसिंह धोनी हजर राहणार