माद्रिद : स्पॅनिश फुटबॉल लीग म्हणजेच ला-लीगा तीन महिन्यांच्या कालावधीनंतर ११ जूनपासून सुरू होत आहे. २०२०-२१ मोसमाला १२ सप्टेंबरपासून सुरुवात होईल, असे स्पॅनिश क्रीडा परिषदेने स्पष्ट केले.

स्पेनमधील दोन स्पर्धाच्या उर्वरित ११ फेऱ्यांना सुरुवात करण्यावर स्पॅनिश फुटबॉल महासंघ आणि ला-लीगाचे एकमत झाले आहे. यंदाचा मोसम १९ जुलैला समाप्त होईल. बेटिस विरुद्ध सेव्हिला यांच्यात होणाऱ्या सामन्याने करोनानंतरच्या मोसमाला ११ जूनपासून सुरुवात होईल. ८ जूनपासून संघांना सराव करण्याची अनुमती देण्यात आली आहे. ‘स्पर्धेचे नवे स्वरूप, प्रवास आणि अन्य बाबतीत जवळपास १३० जण कठोर मेहनत घेत आहेत,’ असेही परिषदेकडून सांगण्यात आले. मार्च महिन्यात ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.

बायर्नचे खेळाडू मानधनकपातीस तयार

बर्लिन : मोसमाअखेपर्यंत मानधन कपात करण्यासाठी बायर्न म्युनिकचे फुटबॉलपटू तयार झाले आहेत. करोनामुळे आर्थिक संकट अधिक गडद झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे क्लबचे अध्यक्ष हेर्बर्ट हायनर यांनी सांगितले.  एप्रिल महिन्यात बायर्नचे खेळाडू २० टक्के पगारकपातीला तयार झाले होते. मात्र या वेळी ही रक्कम किती असेल, हे मात्र हायनर यांनी स्पष्ट केले नाही. ‘‘आमचे खेळाडू परिस्थिती ओळखून मानधनकपातीला तयार झाले, हे समाधानकारक आहे. या मोसमाच्या अखेपर्यंत त्यांना या कपातीला सामोरे जावे लागेल,’’ असे हायनर म्हणाले.

स्कॉटलंडच्या संघांना सरावासाठी हिरवा कंदील

लंडन : स्कॉटिश प्रीमियरशिप लीगमधील संघांना ११ जूनपासून सराव करण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. २०२०-२१चा मोसम १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. यंदाचा मोसम करोनामुळे स्थगित करण्यात आला असून सेल्टिक एफसीला विजेते घोषित करण्यात आले होते.

हावेट्र्झच्या गोलमुळे लेव्हरकुसेन विजयी

बर्लिन : युवा काय हावेट्र्झ याने केलेल्या एकमेव गोलमुळे लेव्हरकुसेन संघाने बुंडेसलीगा फुटबॉलमध्ये फ्रेयबर्ग संघावर १-० अशी मात केली. या विजयासह लेव्हरकुसेनने गुणतालिकेत ५६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. २० वर्षीय हावेट्र्झ हा बुंडेसलीगाच्या इतिहासात ३५ गोल करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. जर्मनीच्या अव्वल क्लबकडून ५० आणि १०० सामने खेळणारा तसेच २०१७ मध्ये लेव्हरकुसेनसाठी गोल करणारा तो जर्मनीचा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. करोनानंतर बुंडेसलीगाला सुरुवात झाल्यानंतर चार सामन्यांत त्याचा हा पाचवा गोल ठरला.

सेरी-ए फुटबॉल स्पर्धा २० जूनपासून

मिलान : सेरी-ए स्पर्धेला २० जूनपासून सुरुवात होणार असून एकाच दिवशी चार सामने खेळवण्यात येणार आहेत, अशी माहिती क्रीडामंत्री विन्सेंझो स्पाडाफोरा यांनी दिली. सेरी-ए स्पर्धा उपांत्य फेरीच्या टप्प्यावर थांबवण्यात आली होती. आता एका आठवडय़ाच्या आत ही स्पर्धा संपवण्यात येणार आहे.