जबरदस्त सांघिक खेळाच्या जोरावर दोन शानदार विजय मिळवणाऱ्या श्रीलंकेचा विजयरथ रोखण्याचे आव्हान इंग्लंडसमोर आहे. दुखापतींनी ग्रासलेल्या आणि सातत्याचा अभाव असणाऱ्या इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध डकवर्थ-लुईस पद्धतीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी ते आतुर आहेत, मात्र त्यांच्यासमोरचे आव्हान खडतर आहे. कुशल परेरा, महेला जयवर्धने चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, अजंथा मेंडिस विकेट्स मिळवणे आणि धावा रोखण्याचे काम अचूकतेने करीत आहेत. अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज आणि थिसारा परेरा श्रीलंकेसाठी उपयुक्त निर्णायक भूमिका बजावत आहेत. कुमार संगकाराला सूर गवसल्यास इंग्लंडच्या अडचणींत भर पडू शकते.
दुसरीकडे मायकेल लंब, जोस बटलर, मोइन अली या त्रिकुटावर इंग्लंडच्या फलंदाजीची भिस्त आहे. रवी बोपारा या अनुभवी अष्टपैलू खेळाडूकडून इंग्लंडला मोठय़ा अपेक्षा आहेत. स्टुअर्ट ब्रॉड आणि इऑन मॉर्गन दोघेही महत्त्वाचे खेळाडू दुखापतीतून पूर्णपणे सावरून खेळावेत अशीच इंग्लंड संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे. अननुभवी गोलंदाजी ही इंग्लंडसाठी चिंतेचा विषय आहे.
संघ : श्रीलंका : दिनेश चंडिमल (कर्णधार), कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, लहिरू थिरिमाने, सीकुगे प्रसन्न, थिसारा परेरा, सचित्र सेनानायके, रंगना हेराथ, अजंथा मेंडिस, सुरंगा लकमल, नुवान कुलसेकरा, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज.
इंग्लंड : स्टुअर्ट ब्रॉड (कर्णधार), इऑन मॉर्गन, मोइन अली, इयान बेल, रवी बोपारा, टीम ब्रेसनन, जोस बटलर, जेड डर्नबॅच, अलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, क्रेग किस्वेटर, मायकेल लंब, स्टीफन पॅरी, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स.
सामन्याची वेळ : संध्याकाळी ७ पासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३