१८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता शहरात आशियाई खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आशियाई खंडात महत्वाची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय चमूची घोषणाही करण्यात आलेली आहे. मात्र, यंदाच्या खेळांमध्ये भारतीय पथकाचं प्रतिनिधीत्व हे पुन्हा एकदा डागाळलेले नेते आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकारी करणार आहेत.

उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथील भाजपचे खासदार ब्रिजभुषण सिंह यांची भारतीय ऑलिम्पिक समितीने भारतीय पथकाच्या प्रमुख पदावर नियुक्ती केली आहे. २०१४ साली झालेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजभुजण सिंह यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याचसोबत ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या राजकुमार सचेती यांना ब्रिजभुषण सिंह यांच्या नंतर उप-प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. २०१० साली दिल्ली राष्ट्रकुल खेळांमधील भ्रष्टाचार प्रकरणात सचेती यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका CVC (Central Vigilance Committee) ने ठेवला होता.

याव्यतिरीक्त माजी सेक्रेटरी जनरल ललित भानोत यांनाही भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आशियाई खेळांच्या तयारीचा आढावा घेणाऱ्या समितीचं अध्यक्षपद दिलं होतं. दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी भानोत वर्षभरत तरुंगामध्ये होते. आशियाई खेळांसाठी अधिकारीवर्ग नेमण्याच्या निकषांबद्दल विचारलं असता, ऑलिम्पिक संघटनेचे सेक्रेटरी जनरल राजीव मेहता यांनी काहीही भाष्य करण टाळलं. मात्र काही अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर, ब्रिजभुषण सिंह, सचेती यांच्या नियुक्तीमध्ये काहीही चुकीचं नसल्याचं सांगितलं. ब्रिजभुषण सिंह २०१२ पासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत, या अधिकाराने त्यांची आशियाई खेळांसाठी भारतीय पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली असल्यास त्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नसल्याचंही अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.