आपल्या खेळाने जगभरातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अखेर विवाहबंधनात अडकला. त्याने बालमैत्रिण अँटोनेला रॉक्युझोसोबत विवाहबद्ध झाला. लॅटिन अमेरिकन पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून क्रीडाविश्वात मोठी चर्चा होती. या लग्नसोहळ्यासाठी क्रिडा आणि चित्रपटक्षेत्रातील तारे तारकांनी हजेरी लावल्य़ाचे पाहायला मिळाले. अर्जेंटिनामधील सिटी सेंटर रोसारियो कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या थाटामाटात मेस्सी आणि अँटोनेला यांचा विवाहसोहळा पार पडला.

या जोडीला लग्नासाठी २५० पाहुणे आमंत्रित होते. पॉप स्टार शकिरा, तिचा पती गेरार्ड पिक यांचाही पाहुण्यांच्या यादीत समावेश होता. लग्नासाठी क्रिडाविश्वातील अनेक स्टार खेळाडूंनी उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अँटोनेला रॉक्युझो हिने क्लाराने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता. त्याखेरीज पाहुण्यांकरिताही २० केशभूषातज्ज्ञांची व्यवस्था करण्यात आली होती. मेस्सी हा एरव्ही येथील शहरात सामान्य नागरिकाप्रमाणे वावरत असला तरीही या कॉम्प्लेक्सभोवती कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. लग्नाच्या निमित्ताने आलेल्या दिग्गज पाहुण्यांना त्रास होऊ नये, यासाठी परिसरात सामान्यांसाठीची रहदारी बंद करण्यात आली होती.  फुटबॉलच्या मैदानावर अद्भुत क्षमतेने जगभरातल्या चाहत्यांवर लिओनेल मेस्सीची जादू आहे. मस्सी आणि अँटोनेला या जोडीलाही चाहत्यांनी खूप प्रेम दिल्याचे पाहायला मिळाले आहे. या दोघांना लग्नापूर्वीच दोन मुले आहेत. आपल्याला कोणतीही भेट न देता त्याएवढी रक्कम येथील अनाथ मुलांच्या संगोपनासाठी उभारण्यात आलेल्या निधीकरिता द्यावी, असे आवाहन मेस्सी व रोकुझो यांनी लग्नापूर्वी  केले होते. लिओ मेस्सी फाऊंडेशनद्वारे गेली काही वर्षे मेस्सी हा अनाथ मुलांसाठी देखील कार्यरत आहे.