भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेलं औषध त्याला महागात पडलं. त्याच्या या कृत्यामुळे तो डोपिंग चाचणीत दोषी आढळला. त्यामुळे BCCI कडून पृथ्वीला आठ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. १६ मार्च २०१९ ते १५ नोव्हेंबर २०१९ असा त्याच्या निलंबनाचा कालावधी असेल. त्यामुळे बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात होणाऱ्या आगामी मालिकांमध्ये त्याला संधी मिळू शकणार नाही. दरम्यान डोपिंग चाचणीत दोषी आढळलेला पृथ्वी शॉ पहिलाच क्रिकेटपटू नाही. त्याआधी देखील अनेक देशांचे विविध क्रिकेटपटू डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने निलंबनाच्या कारवाईला सामोरे गेले आहेत.

१. युसूफ पठाण (भारत), २०१७

२०१७ साली युसूफ पठाण एका देशांतर्गत स्पर्धेत खेळत होता. त्यावेळी डोपिंग समितीने (ADRV) केलेल्या चाचणीत युसूफ पठाण दोषी आढळला होता. त्याला दिलेल्या औषधांऐवजीचुकीचे औषध घेतल्याने त्याच्या शरीरात डोपिंग समितीने बंदी आणलेली द्रव्ये गेली होती. युसुफने त्यावेळी आपली चूक मान्य केली होती. त्यामुळे ADRV ने त्याचे स्पष्टीकरण ग्राह्य धरत त्याच्यावर ५ महिन्यांची बंदी घातली होती.

२. मोहम्मद शेहझाद (अफगाणिस्तान), २०१७

अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद शेहझाद याला २०१७ मध्ये डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने निलंबनाच्या कारवाईचा सामना करावा लागला. २०१७ मध्ये दुबईमध्ये सुरु असलेल्या एका स्पर्धेत खेळत असताना तो डोपिंगमध्ये दोषी ठरला. त्यामुळे जागतिक डोपिंग समितीने त्याच्यावर १२ महिन्यांची बंदी घातली होती. वजन कमी करण्यासाठी त्याने तो औषध सेवन केल्याचे ICC ने देखील मान्य केले होते.

३. आंद्रे रसल(वेस्ट इंडिज), २०१७

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल याला २०१७ मध्ये निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. जमैका अँटी डोपिंग आयोगाने मार्च २०१७ मध्ये त्याला दोषी ठरवले होते. त्यानंतर जानेवारी ३१ पासून पुढील वर्षभरासाठी त्याला निलंबित करण्यात आले होते.

४. यासिर शाह (पाकिस्तान), २०१५

पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाह याचे २०१५ साली डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे ३ महिन्यासाठी निलंबन करण्यात आले होते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर शाहने लघवीचे नमुने तपासणीसाठी ICC कडे सुपूर्द केले होते. त्यावेळी तो दोषी आढळला. त्यामुळे त्याच्यावर २७ डिसेंबर २०१५ ते २७ मार्च २०१६ या कालावधीसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

५. प्रदीप सांगवान (भारत), २०१३

IPL दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघातून खेळणारा वेगवान डावखुरा गोलंदाज प्रदीप सांगवान यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली होती. डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने त्याच्यावर १८ महिन्याची बंदी घालण्यात आली होती.

६. उपुल थरंगा (श्रीलंका), २०११

उपुल थरंगा हा डोपिंग चाचणीत दोषी आढळणारा श्रीलंकेचा पहिला आंतराराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेदरम्यान तो डोपिंग चाचणीत दोषी आढळला होता. त्याने सेवन केलेल्या औषधात अँटी डोपिंग समितीने बंदी घातलेली द्रव्ये होती.

७. मोहम्मद असिफ (पाकिस्तान), २००९

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद असिफ याच्यावर १ वर्षाची IPL बंदी घालण्यात आली होती. IPL च्या पहिल्याच हंगामात त्याची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तो दोषी आढळला. २००८ मध्ये त्याची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

८. शोएब अख्तर आणि मोहम्मद असिफ (पाकिस्तान), २००६

पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि मोहम्मद असिफ या दोघांना अनुक्रमे २ आणि १ वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. पाकिस्तानच्या त्रिसदस्यीय लवादाने या दोघांवर बंदीची कारवाई केली होती. हे दोघेही चाचणीमध्ये दोषी आढळले होते, त्यामुळे त्यांना चॅपियन्स ट्रॉफिच्या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते.

९. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया), २००३

२००३ साली विश्वचषक स्पर्धेच्या काळात डोपिंग चाचणीत शेन वॉर्न दोषी आढळला होता. त्यामुळे त्याला २ दिवसांतच मायदेशी पाठवण्यात आले होते. दडपणाच्या काळात घेण्यात येणारी औषधे खाल्ल्यामुळे तो दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर वर्षभराच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.